कोरोना काळात गेली नोकरी, नवरा बनला जिगोलो; भांडाफोड होताच पत्नीने मागितला घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 02:24 PM2021-04-13T14:24:22+5:302021-04-13T14:28:24+5:30
गेल्या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आला होता लॉकडाऊन, या काळात अनेकांच्या नोकऱ्यांवर आली होती गदा.
गेल्या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लावण्यात आला होता. या काळात अर्थचक्र पूर्णपणे थांबलं होतं. याचाच परिणाम म्हणून अनेकांना आपली नोकरीही गमावावी लागली होती. लॉकडाऊनचा फटका बसललेल्या बंगळुरूमधील एका व्यक्तीला यानंतर नाईलाजानं जिगोलो व्हावं लागलं. सुरूवातीच्या काळात सर्वकाही ठीक होतं. परंतु कालांतरानं त्याच्या पत्नीला याबद्दल समजलं. त्यानंतर त्यांच्या संसारात मोठा भूकंप आला.
२४ वर्षीय महिलेनं याप्रकरणानंतर घटस्फोटाची मागणी केली आहे. नोकरी गेल्यानंतर आपला पती जिगोलो बनला आणि त्यानं ही बाब लपवून ठेवल्याचं त्यानं महिलेनं सांगितलं. बंगळुरु पोलीस आणि महिला हेल्पलाईननं दोघांमधील मतभेद मिटवण्यासाठी अनेकदा काऊंन्सिलिंग केलं. परंतु त्यानंतरही आता हे दांपत्य एकत्र राहू इच्छित नसल्याचं समोर आलं आहे. दोघांनीही आपल्या संमत्तीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार दोघांची भेट २०१७ मध्ये कॉल सेंटरच्या कॅन्टिनमध्ये झाली होती. त्यानंतर २०१९ मध्ये दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघांनी बंगळुरूमधील एका ठिकाणी भाडेतत्त्वावर घरही घेतलं. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लावण्यात आला. या दरम्यान, तिच्या पतीची नोकरी गेली. त्यानंतर त्यानं नोकरीचा शोध सुरू केला. दरम्यान, काही महिन्यांनंतर महिलेला आपला पती काहीतरी लपवत असल्याचं जाणवलं. तासनतास तो लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये व्यस्त होता. इतकंच नाही तर अनेकदा तो वेळी अवेळी घराबाहेरही जात होता. तो कुठे जातोय याची माहितीही आपल्याला देत नव्हता असं महिलेनं सांगितलं.
त्याच्यावर संशय आल्यानंतर महिलेनं नोव्हेंबर महिन्यात आपल्या भावाच्या मदतीनं त्याचा लॅपटॉप उघडला. त्यात तिला एक सिक्रेट फोल्डर सापडला. या फोल्डरमध्ये महिलेला आपल्या पतीचे काही आक्षेपार्ह फोटो दिसून आले. तसंच आपला पती जिगोलो असून तासासाठी ३ ते ५ हजार रूपये आकारतो याची माहितीही तिला मिळाली. दरम्यान, महिलेच्या पतीनं या गोष्टी कबूल केल्याची माहिती काऊन्सिलरकडून देण्यात आली. आपल्या एका मित्रानं हे काम सूचवलं होतं असं त्या व्यक्तीनं सांगितल्याचंही काऊन्सिलर यांनी सांगितलं.