१००० वर्षांपेक्षा अधिक जगणारी जिन्कगो झाडे!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 03:46 AM2020-01-19T03:46:13+5:302020-01-19T03:46:34+5:30
डायनासोर नष्ट होण्यापासून ते हिरोशिमावरच्या अणुहल्ल्यापर्यंतच्या सर्वात मोठ्या आपत्तीतून ही झाडे जगली आहेत.
जिन्कगो ही जगातील सर्वात प्राचीन वृक्ष प्रजाती आहे. जवळजवळ २०० दशलक्ष वर्षांपासून या ग्रहावर आहे. एकच जिन्कगो वृक्ष शेकडो वर्षे जगतो. कदाचित, हजारांहून अधिक वर्षे. डायनासोर नष्ट होण्यापासून ते हिरोशिमावरच्या अणुहल्ल्यापर्यंतच्या सर्वात मोठ्या आपत्तीतून ही झाडे जगली आहेत.
त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य काय?
चीनमधील जिन्कगो बिलोबाच्या झाडांवरच्या फांद्यांवरची वर्तुळे आणि जीन्सच्या अवलोकनानुसार काही वृक्ष १,००० वर्षांपेक्षा जास्त जुने असल्याचे पुढे आले आहे. उत्तर टेक्सास विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ रिचर्ड डिक्सन म्हणाले की, मानवांमध्ये जसे जसे वय वाढते, तशी रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहू शकत नाही. मात्र, ही झाडे १,००० वर्षे जुनी असली, तरी त्यांची रोगप्रतिकारशक्ती भरपूर आहे. त्यामुळे झाडे २० वर्षांची वाटतात.
जनुकांमध्ये मृत्यूचा कार्यक्रम नाही
रिचर्ड डिक्सन यांच्या चीन आणि अमेरिकेतील सहकाऱ्यांनी तरुण आणि वृद्ध जिन्कगोच्या झाडांची तुलना केली. ‘प्रोसेसिंग आॅफ नॅशनल अकॅडमी आॅफ सायन्स’ हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. झाडाच्या सालीमागील जिवंत पेशींचा थर ‘व्हॅस्क्युलर कॅम्बियम’ची आनुवंशिक तपासणी केल्यानंतरआढळले की, जिन्कगो वृद्धापकाळातही अमर्याद वाढते. हे ‘कॅम्बियम’ व जनुकांमध्ये संवेदना किंवा मृत्यूचा कोणताही कार्यक्रम नसतो.
पानेही तितकीच तरतरीत
शेकडो वर्षांनंतरही त्यांनी आपल्या अस्तित्वासाठी आपला जीवनक्रम सुरू ठेवला आहे. जुनी झाडेदेखील बरेच बियाणे तयार करतात. त्यांची पाने तरुण झाडांइतकीच संपन्न असतात. कॅलिफोर्नियातील ‘मेथुसेलाह’ म्हणून ओळखल्या जाणाºया ८०० वर्षांच्या ‘ब्रिस्टलॉन’ झाडाचा आनुवंशकीय कार्यक्रमसुद्धा असाच असू शकेल, असे शास्त्रज्ञांना वाटते. मात्र, अद्याप याची चिकित्सा होणे बाकी आहे.
झाडेही वृद्ध होतात पण...
जरी जिन्कोगो दीर्घ आयुष्य जगतात, तरीही ती वृद्ध होतातच, पण खोडात असलेले कॅम्बियम अखंड आणि सक्रिय राहते. कधी-कधी झाडे फक्त पोकळ ओंडक्यासारखी होतात, परंतु ‘कॅम्बियम’ अखंड असल्याने ती पाने आणि फुले तयार करतात किंवा पेंढा म्हणून जगू शकतात. ही झाडे पूर्णपणे मरतात का, याचा अभ्यास सुरूच आहे.