एका चिमुकलीच्या शिक्षणाची रडकथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 02:46 PM2017-10-04T14:46:11+5:302017-10-04T14:54:01+5:30
या व्हिडिओमधून एक गोष्ट नक्की कळते ती म्हणजे मुलांना अशाप्रकारे धाक दाखवून अभ्यास करवून घेता येत नाही.
युट्यूब असो वा फेसबुक किंवा इन्स्टाग्राम एखादा व्हिडीओ अपलोड केला की क्षणार्धात जगभर फिरतो. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडिओ सोशल मीडियवर प्रचंड व्हायरल झालेला. एक लहान मुलगी शाळेचा अभ्यास करताना प्रचंड रडत होती. तिच्या रडण्याचा आवेग इतका करुण होता की खुद्द क्रिकेटर विराट कोहली यानेही त्यावर जबरी टीका केली. खरंतर त्याने हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केल्यानंतरच तो प्रत्येकाच्या मोबाईलवर दिसू लागला.
एक लहान मुलगी या व्हिडिओमध्ये ढसाढसा रडत असल्याचं दिसतं. तिला अभ्यासाचा वैताग आलाय, त्यामुळे अभ्यास नको, मला बाहेर जाऊ दे अशी तिनं ओरड केली. मात्र तिच्या आईने तिला जबरदस्तीने अभ्यास करायला लावल्याने तिने एकच कल्लोळ केला. रडत रडतच तिने पाढे म्हणालयाल सुरुवात केली. चुकल्यावर तिची आई तिला ओरडत होती. त्यामुळे ती बिचारी आणखी बावचळली. रडत रडतच तिनं तिचा राग व्यक्त केला. लहानग्यांचा लाडिक राग आपल्याला कळतो, मात्र या व्हिडिओमधला त्या मुलीचा राग आपल्याच अंगावर काटा आणणारा आहे. त्यामुळे आपण आपल्या मुलांना अभ्यासाच्या बाबतीत किती त्रास देतो हे नक्कीच जाणवतं. तिच्यावर अभ्यासाची होत असलेली बळजबरी आपल्यालाही पाहवणार नाही, मग तिच्या आईला किंवा ती हमसुन हमसुन रडत असताना तिच्या इतर नातेवाईंकांना तिचा व्हिडिओ तरी कसा काढावासा वाटला असा सवालही अनेकांनी व्यक्त केला. विराट कोहलीने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम अशा प्रत्येक सोशल साईटवर तो क्षणार्धात व्हायरल झाला. अनेकांनी या व्हिडिओवर आक्षेप घेतला. मारुनमुक्कुन कोणाचाच अभ्यास घेता येत नाही, पालक इतके निर्दयी कसे वागतात? दिवसरात्र अभ्यास केल्यानेच यशस्वी होता येतं असं नाही, वगैरेच्या अनेक तिखट प्रतिक्रिया या माध्यमातून समोर आल्या.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ती मुलगी कोण, तो व्हिडिओ कोणी व्हायरल केला यामागचं खरं सत्य लोकांसमोर आलंही. मात्र ते सत्यही कित्येकांना पटलं नाही. एका प्रसिद्ध संगीतकाराची ही भाची. तिचं नाव सही. ती लहानपणापासून प्रचंड मस्तीखोर. त्याचबरोबर तेवढीच ती नौटंकीसुद्धा. त्यामुळे इतरांचं लक्ष आपल्याकडे वळण्यासाठी तीने यावेळीही नौटंकीच केला असल्याचा दावा या संगीतकाराने केला आहे. आमची सही किती आगाऊ झाली आहे हे दाखवण्यासाठी तो व्हिडिओ काढला आणि त्यांच्या नातेवाईंकाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकला. आणि त्यानंतर कोणीतरी तो इतर ग्रुपवर टाकून व्हायरल केला.
हा व्हिडिओ प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आला. अनेक प्रसिद्धी माध्यमांनीही या व्हिडिओची दखल घेतली. विविध मानसिक तज्ज्ञांशी बोलून, त्यांची प्रतिक्रिया घेऊन अनेक पत्रकार लेखकांनीही यावर जहरी टीका केली. अगदीच वरवर पाहता, त्या मुलीचा व्हिडिओमधला आवेग इतका तिखट होता की व्हिडिओ पाहताच क्षणी कोणालाही त्या मुलीची किवच येईल. कालांतराने हा विषय लोकांच्या ध्यानातूनही गेला. मात्र जेव्हा हा व्हिडिओ आला तेव्हा मात्र अनेकांवर यावर खडसून टीका केली. एकंदरीत काय तर एखादा विषय येतो, त्यावर चर्चा होते, टीका होते आणि पुन्हा नवा विषय सापडला की मागचं सारं काही विसरता येतं. पण या व्हिडिओमधून एक गोष्ट नक्की कळते ती म्हणजे मुलांना अशाप्रकारे धाक दाखवून अभ्यास करवून घेता येत नाही.