बॉयफ्रेंड भाऊ निघण्याची वाटतेय भीती; डीएनए टेस्ट करून तरुणीची झोप उडाली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 08:46 AM2021-11-03T08:46:46+5:302021-11-03T08:47:04+5:30
डीएनए टेस्टनंतर सापडले ५० भाऊ-बहिण; तरुणीला बसला जोरदार धक्का
डीएनए टेस्ट केल्यानं एका तरुणीची झोप उडाली आहे. आपले ५० गुप्त भाऊ बहिण असल्याचं तरुणीला डीएनए चाचणीमुळे समजलं. याबद्दल तरुणीला आधी कोणतीच माहिती नव्हती. त्यामुळे आता तरुणीला भविष्याची चिंता सतावू लागली आहे.
द सननं दिलेल्या वृत्तानुसार @izzyvn_98 नावाच्या एका टिकटॉक युजरनं एक व्हिडीओ शेअर केला. त्यात तिनं धक्कादायक खुलासा केला. आपल्या पूर्वजांबद्दल जाणून घेण्यासाठी तरुणीनं २०१८ मध्ये डीएनए चाचणी केली. त्या चाचणीचा अहवाल पाहून तरुणीला धक्काच बसला. त्यानंतर एका महिलेनं मेसेज करून तरुणीकडे तिची माहिती मागितली. कारण त्या महिलेच्या मुलीचा डीएनएदेखील तरुणीशी जुळणारा आहे.
डीएनए चाचणी करणाऱ्या तरुणीचा जन्म स्पर्म डोनरमुळे झाला. तरुणीच्या आईनं एका स्पर्म डोनरच्या मदतीनं बाळाला जन्म दिला. मात्र याबद्दल तरुणीला कोणतीही कल्पना नव्हती. डीएनए चाचणी केल्यानंतर तरुणीनं स्पर्म डोनरच्या माध्यमातून बाळांना जन्म देणाऱ्या महिलांचा शोध घेतला. त्यानंतर आपल्या सर्व भाऊ-बहिणींना शोधून काढण्यासाठी तिनं फेसबुकवर एक ग्रुप तयार केला. या माध्यमातून ५० गुप्त भाऊ-बहिण तिच्या संपर्कात आले.
तरुणीच्या संपर्कात आलेल्या ५० जणांचा जन्म एकाच स्पर्म डोनरच्या माध्यमातून झाला आहे. ही संख्या आणखी वाढू शकते, असं तरुणीनं सांगितलं. भविष्यात एखाद्या तरुणाला डेट केल्यास तो भाऊ निघण्याची भीती आता तरुणीला वाटू लागली आहे. तरुणीच्या टिकटॉक व्हिडीओवर एका युजरनं कमेंट केली असून स्पर्म डोनेशनच्या मदतीनं आपली १५० मुलं असल्याचं त्यानं म्हटलं आहे.
ब्रिटनमध्ये एक डोनर १० कुटुंबांना स्पर्म देऊ शकतो. एप्रिल २००५ मध्ये ह्युमन फर्टिलायझेशन एंड (एचएफई) कायद्याच्या अंतर्गत झालेल्या सुधारणांनंतर स्पर्म डोनरची संपूर्ण माहिती देणं अनिवार्य करण्यात आलं. स्पर्म डोनरच्या माध्यमातून जन्मलेली मुलं वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांच्या वडिलांची माहिती मिळवू शकतात.