बाबो! वेगळ्या लूकसाठी डोळ्यात काढला टॅटू, तीन आठवड्यांसाठी झाली होती आंधळी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 01:28 PM2019-11-04T13:28:40+5:302019-11-04T13:32:39+5:30
एखाद्या व्यक्तीला कशाचं वेड असेल हे काही सांगता येत नाही. तुम्हीही अशा अनेक लोकांबाबत ऐकलं असेल की, विचित्र आवडी असलेले लोक बघितले असतील.
एखाद्या व्यक्तीला कशाचं वेड असेल हे काही सांगता येत नाही. तुम्हीही अशा अनेक लोकांबाबत ऐकलं असेल की, विचित्र आवडी असलेले लोक बघितले असतील. एक मुलगी आहे एम्बर ल्यूक नावाची. तिचं वय आहे २४. एम्बरला टॅटू काढण्याचा शौक आहे. तिने तिच्या संपूर्ण शरीरावर टॅटू काढले आहेत. आतापर्यंत तिने २०० टॅटू काढले आहेत. तिला टॅटूच्या विश्वात ड्रॅगन गर्ल म्हणून ओळखलं जातं. एम्बरने टॅटूच्या मदतीने तिच्या डोळ्यांचा रंगही नीळा करून घेतला आहे. असं करून ती तीन आठवड्यासाठी आंधळी झाली होती.
१८.३७ लाख रूपये केला खर्च
न्यू साउथ वेल्सला राहणाऱ्या एम्बरने लूक बदलण्यासाठी १८.३७ लाख रूपये खर्च केले आहेत. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, एम्बरला स्वत:ला निळ्या डोळ्यांची व्हाइट ड्रॅगन म्हणवून घेणं आवडतं. एम्बरने तिचा हा अनुभव सांगितला. तिने सांगितले की, यासाठी ४० मिनिटांचा वेळ लागला होता आणि तीन आठवडे ती आंधळी झाली होती.
ती म्हणते की, 'मी त्या अनुभवाला शब्दात सांगू शकत नाही. ज्यावेळी टॅटूची इंक माझ्या डोळ्यात टाकली जात होती तेव्हा मला असं जाणवत होतं की, कुणीतरी माझ्या डोळ्यात काचेचे १० तुकडे टाकले आहेत'. एम्बर सांगते की, ही प्रक्रिया वर्षातून चारवेळा करावी लागते. हे फारच भयंकर होतं.
एम्बरने सांगितले की, २०२० पर्यंत ती तिचं शरीर संपूर्ण टॅटूने झाकणार आहे. एम्बरने तिच्या स्तनांवर, ओठांवर ट्रान्सफॉर्मेशनही केलं आहे. आता तिला कोणतही मॉडीफिकेशन करायचं नाहीये. एम्बर ही १६ वर्षापासून टॅटू काढत आहे. ती याला निगेटीव्ह एनर्जी दूर करण्याचा उपाय मानते.