वडीलांच्या आजारपणात तिने हॉस्पीटलमध्येच केलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 03:51 PM2017-11-30T15:51:01+5:302017-11-30T16:19:11+5:30
वडीलांना तिचं लग्न पाहायची फार इच्छा होती मात्र आजारपणात त्यांना बाहेर पडता आलं नसतं म्हणून हा प्लॅन आखला गेला.
सॅन फ्रान्सिस्को : हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या वडिलांना आपल्या लग्नात उपस्थित राहता येणार नाही या चिंतेत असणाऱ्या एका मुलीने हॉस्पिटलमध्येच लग्न केल्याचं समोर आलं आहे. डेलिमेलच्या वृत्तानुसार, सॅन फ्रान्सिस्कोच्या एका हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडलाय. आपल्या लेकीने आपल्याला बरं वाटावं म्हणून हॉस्पिटलमध्येच तिच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण साजरा केल्याने वडिलांनाही फार आनंद झाला.
आणखी वाचा - इव्हांका ट्रम्पला मिळाली भेट म्हणून 40 लाख रुपयांची साडी
आणखी वाचा - सामूहिक एनसीसी गीत गायनाची 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद
प्रेस्टन रोलन या ६४ वर्षीय इसमाला काही महिन्यांपुर्वी ब्लड कॅन्सर असल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर सॅन फ्रान्सिस्कोच्या युसीएफसी मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. ब्लड कॅन्सर झाल्याने प्रेस्टन यांची तब्येत आणखी खालावली होती. त्यामुळे ते फार काळ राहू शकतील की नाही याबाबत डॉक्टरांना खात्री नव्हती. पण जाता जाता आपल्या लेकीचं लग्न बघण्याची प्रत्येक वडिलांची इच्छा असतेच. त्यामुळे विएन्सी स्टॅन्टन या २७ वर्षीय त्यांच्या मुलीने हॉस्पिटलमध्येच लग्न करण्याचा घाट आखला. यासाठी तिने आपला होणाऱ्या नवऱ्यालाही अशा प्रकारे लग्न करण्याची विनंती केली. त्यानेही कसलेच आढेवेढे न घेता हॉस्पिटलमध्ये लग्न करण्यास होकार दिला. साहजिकच यासाठी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाच्या परवानगीची गरज होतीच. हॉस्पिटलमध्ये लग्न करण्यास हॉस्पिटलच्या व्यवस्थापनेनेही होकार दिला. तब्बल १५० नर्सच्या टीमने हे लग्न यशस्वी होण्याकरता मदत केली. हॉस्पिटल सजवण्यापासून ते सगळ्या वस्तू आणून देण्यापर्यंत सगळयांचाच हातभार या लग्नाला लागला. धर्मगुरु, स्वयंपाकी, वादक या सगळ्यांनी त्यांच्यापरीने हा विवाह सोहळा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.
आणखी वाचा - जेव्हा सरफराज खानला मारण्यासाठी रॉबिन उथप्पा ड्रेसिंग रुममध्ये घुसला होता
याबाबत बोलताना वडील प्रेस्टन रोलन म्हणाले, ‘माझ्या मुलीचं लग्न याची देही याची डोळा पाहता आल्यामुळे मला फार आनंद होत आहे. मी माझ्या मुलीचं लग्न पाहीन की नाही याबाबत मला शाश्वती नव्हती. मात्र मुलीच्या प्रयत्नाने आणि हॉस्पिटलच्या व्यवस्थापनामुळे हे सुख मला अनुभवता येत आहे.’ ‘अवाढव्य खर्च करून, आकर्षक सजावट करून आपलं लग्न व्हावं असं प्रत्येकालाच वाटतं. मात्र हॉस्पिटलमध्ये आजारी असलेल्या वडीलांशिवाय हे लग्न अशक्यच होतं. त्यांचे आशीर्वाद सतत पाठीशी असतातच, मात्र तरीही या लग्नात त्यांची उपस्थितीत मोलाची होती. त्यांच्या तब्येतीमुळे त्यांना बाहेर येता आलं नसतं, म्हणूनच मी हॉस्पिटलमध्येच लग्न करण्याचा निर्णय घेतला,’ असं स्टॅन्टट हिनं म्हटलं आहे.
Get Latest Marathi News, Mumbai News, Pune News, Maharashtra News Here on Lokmat.com