अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेला गोंधनापूरचा किल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 11:27 AM2021-08-19T11:27:43+5:302021-08-19T11:29:07+5:30

Gondhanapur fort : दगड व विटांनी बांधकाम केलेला किल्ला सुस्थितीत आहे.

Gondhanapur fort in the grip of encroachment | अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेला गोंधनापूरचा किल्ला

अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेला गोंधनापूरचा किल्ला

googlenewsNext

- विवेक चांदूरकर
खामगाव : तालुक्यातील गोंधनापूर येथे दगड व विटांमध्ये बांधकाम केलेला किल्ला असून, हा किल्ला अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे. कधीकाळी अनेकांचा राबता असलेल्या या किल्ल्याची आता भग्नावस्था झाली आहे.  
बुलडाणा रोडवर खामगावपासून ९ किमी अंतरावर असलेले गोंधनापूर हे एक छोटेस गाव आहे. हे गावच किल्ल्याच्या परकोटत वसलेले आहे़.  गावात एक भुईकोट किल्ला आहे. दगड व विटांनी बांधकाम केलेला किल्ला सुस्थितीत आहे. इतिहासाच्या पानांमध्ये दडला असलेल्या या किल्ल्याची विशेषता भुयारी खोल्यांमध्ये दडली आहे़.  किल्ल्यात भुयारामध्ये  खोल्या असून, एका खोलीतून दुसºया खोलीत जाण्यासाठी रस्ता आहे़.  आतमध्ये प्रकाश येण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असून, बाहेर येण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत़.  
    नागपूरचे रघुजी राजे भोसले दुसरे यांनी सन १७९१ मध्ये दिवाण वैद्य यांच्या देखरेखीखाली या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले. या ठिकाणी पूर्वी गढी होती. भोसले यांचे दिवाण कृष्णराव वैद्य यांच्याकडे या किल्लयाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. नागपूरवरून किल्ल्याचे काम पाहणे शक्य होत नसल्याने पिंपळगाव राजा परगण्याचे वतनदार मुरडाजी पाटील यांच्याकडे देखरेखीची जबाबदारी सोपविण्यात आली. माधवराव चिटणीस उर्फ नानासाहेब यांनी मुरडाजी पाटील यांना मुखत्यारपत्र देऊन किल्ल्याच्या देखरेखीची जबाबदारी सोपविली, असल्याचा उल्लेख खामगाव तालुक्यातील स्थापत्य पुस्तकात डॉ. किशोर मारोती वानखडे यांनी केला आहे. हा किल्ला सध्या चिटणीस यांच्या मालकिचा आहे़.  
इ.स. १९४२ साली या किल्ल्यात मोठी आग लागली होती. या आगीत त्यावेळी वास्तव्यास असलेल्या जानकीमाता चिटणीस आणि त्यांच्या कुटुंबीयांचा जळून मृत्यू झाला. यावेळी किल्ल्यातील अनेक वास्तू जळून खाक झाल्या. 
जिल्ह्याच्या इतिहासात गोंधनापूर हे गाव फार प्रसिद्धीस नव्हते. पिंपळगाव राजा हा मोठा परगणा होता. पिंपळगाव राजामध्ये सुद्धा किल्ला होता. तसेच येथील रेणुका देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. रघुजी राजे यांनी मात्र किल्ल्यासाठी गोंधनापूर गावाची निवड केली. गोंधनापूर आधी पिंपळगाव राजा परगण्यात येत होते.  

 
किल्ल्याची थोडी पडझड झाली असली तरी स्थिती सध्याही उत्तम आहे़.  किल्ल्याच्या परकोटाच्या आतमध्ये नागरिकांनी घरे बांधली असून, शेकडो कुटुंबे येथे वास्तव्य करीत आहे़.  किल्ल्याच्या सभोवताल एक किलोमीटर परिघाचा भव्य असा परकोट होता, तो सध्या पडला असून, त्याचे अवशेष पहायला मिळतात़.  या परकोटाला चार मजबूत बुरुज व एक प्रवेशव्दार आहे़.  या परकोटाच्या आत गावकºयांनी घरे बांधली़  या किल्ल्याला तीन प्रवेशव्दार आहेत़.त्यापैकी पहिले प्रवेशव्दार हे परकोटाच्या भिंतीचे आहे़.  यामधून प्रवेश केल्यावर नागरिकांची घरे दिसतात़.  किल्ल्याच्या भिंतीला लागूनच घरे आहेत़.  त्यामुळे नागरिक भिंतीजवळ खत, कचरा टाकतात, गुरे बांधतात़  या किल्ल्यात बाहेरच्या बाजुने सैनिकांसाठी असलेल्या खोलीवर एका ग्रामस्थाने ताबा मिळविला आहे़.  त्याचे कुटूंब या खोलीत राहते़.  
 या किल्ल्याचे बांधकाम तीनशे वर्षांपूर्वी करण्यात आले़.  बांधकाम दोन मजली असून, खालील बांधकाम दगडामध्ये तर वरील बांधकाम विटा व चुन्यामध्ये केले आहे़.  किल्ल्याच्या मुख्य इमारतीला दोन दरवाजे आहेत़  पहिल्या दरवाजातून आत प्रवेश केल्यावर किल्ल्याची भव्यता निदर्शनास येते़  दुसºया दरवाजातून प्रवेश केल्यावर मुख्य किल्ला दृदृीस पडतो़  किल्ल्याच्या डाव्या व उजव्या बाजुला धान्याची कोठारे आहेत़.  घोडयाच्या पागा आहेत़  दुसºया मजल्यावर ओळीने खोल्या आहेत़.  एका खोलीतून किल्ल्याबाहेर पडण्यासाठी चोरवाट आहे़.  
किल्ल्यात पाच ते सहा विहिरी आहेत, या विहिरी सध्या बुजल्या आहेत़  ४० ते ५० फूट उंच असलेल्या किल्ल्याच्या तटावरुन दहा किमी अंतरावरील परिसर न्याहाळता येतो़.  या किल्ल्याच्या तटावर ठिकठिकाणी शत्रूवर नजर ठेवणाºया सैनिकांच्या बंदूका ठेवण्यासाठी जागा केलेली आहे़  किल्लयाला असलेल्या बाहेरील भव्य परकोटाची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहे. गावाच्या पाच किमी अंतरावर या परकोटाचे भग्नावशेष दिसतात़  किल्ल्याच्या प्रवेशव्दाराला कुलूप असून, गावकरी आतमध्ये जात नाहीत़  त्यामुळे सर्वत्र गवत उगवलेले आहे़  भुयारांमध्ये वटवाघळांचे राज्य आहे़  या किल्ल्याचे बांधकाम कुणी केले, याबद्दल माहिती मिळत नाही़ किल्ल्याच्या इतिहासाबद्दल कुणीही अद्याप लिहिलेले नाही़ आजूबाजूच्या लोकांना तर गोंधनापूर गावात भव्य असा किल्ला आहे, याचीही माहिती नाही़  एकंदर हा किल्ला नागरिकांचे अतिक्रमण, शासनाची उदासिनता, चिटणीसांचा दुर्लक्षितपणा यामध्ये अडकला आहे़.  किल्ल्याच्या परिसरात असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी नागपूरचे चिटणीस यांनी न्यायालयात धाव घेतली आहे़.  नागरिकांना न्यायालयाने नोटीसही दिली आहे़.  मात्र गावकरी घरे सोडण्यास तयार नाहीत़.  चिटणीस यांनी हा किल्ला विक्रीसही काढला होता़.  कधीकाळी हा किल्ला जिंकण्यासाठी प्राण लावून युद्ध करण्यात येत होते़.  आता, मात्र एकही ग्राहक मिळाला नाही़.
 

 
भुयारातील खोल्या

अनेक किल्ल्यांमध्ये भुयारात खोल्या असतात. गोंधनापूरच्या किल्ल्यात सुद्धा भुयारामध्ये काही खोल्या आहेत. या भुयारातील खोल्यांमध्ये जाणारा रस्ता अजूनही आहे़  हा रस्ता सरळ नसून, अत्यंत छोट्या छिद्रातून झोपून आतमध्ये प्रवेश करावा लागतो. आतमध्ये सहा ते सात फूट उंच खोल्या आहेत. खोल्यांमध्ये विटांचे बांधकाम करण्यात आले आहे़  तसेच सुर्यप्रकाश येण्यासाठी छोटे छोटे छिद्रही ठेवण्यात आले आहे़  एका खोलीतून दुसºया खोलीत जाण्यासाठी दरवाजा आहे़.  चार ते पाच खोल्यानंतर बाहेर निघण्यासाठी वेगळा रस्ता आहे़. अशाप्रकारे येथे ५२ खोल्या असल्याचे येथील काही वयोवद्ध  ग्रामस्थ सांगतात़  मात्र, सर्वच खोल्या सध्या दिसत नाहीत़  किल्ल्यात फिरताना अनेक भुयारी मार्ग दिसतात. हे मार्ग मातीमुळे सध्या बुजले आहेत. एका खोलीतून भुयारी मार्ग असून, तो  पिंपळगाव राजा येथील देवीच्या मंदिरात निघतो, असे सांगण्यात येते़.

Web Title: Gondhanapur fort in the grip of encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.