"इथे खूप समाधान मिळतं"; सुंदर तरुणी करतेय कब्रस्तानात नोकरी, महिन्याला मिळतो एवढा पगार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 04:50 PM2022-11-28T16:50:42+5:302022-11-28T17:03:24+5:30
22 वर्षीय टॅन स्वत:चे कब्रस्तानातले फोटो आणि व्हिडिओ टिकटॉकवर शेअर करत असते.
एका 22 वर्षीय तरुणीने चक्क कब्रस्तानात नोकरी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी ती साफसफाई आणि अंत्यसंस्काराशी संबंधित गोष्टी पाहते. या कामासाठी तिला महिन्याला 45,000 रुपये वेतनही मिळतं. सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तिचं काम असतं. तसेच आठवडयातून एक सुट्टीही मिळते. चीनमध्ये राहणाऱ्या या तरुणीचे आडनाव टॅन असं आहे.
22 वर्षीय टॅन स्वत:चे कब्रस्तानातले फोटो आणि व्हिडिओ टिकटॉकवर शेअर करत असते. तिचं असं म्हणणं आहे, की तिला या कामात मानसिक समाधान मिळतं. तसंच इथे सामान्यपणे ऑफिसमध्ये आढळणारं राजकारणदेखील नाही. टॅन आपल्या या कामाविषयी म्हणाली की, तिला तिचं वैयक्तिक आयुष्य आणि जॉब यात चांगला समतोल साधायचा होता. शांत वातावरणात काम करण्याची तिची इच्छा होती. तसंच तिला ऑफिसमधल्या धावपळीच्या आयुष्यापासून दूर राहायचं होतं.
एखाद्या नैसर्गिक ठिकाणी किंवा निसर्गाच्या सानिध्यात तिला नोकरी करायची होती. यामुळेच तिने पश्चिम चीनच्या चोंगकिंगसारख्या डोंगराळ भागात ही कब्रस्तानातली नोकरी स्वीकारली. एका व्हिडिओत टॅन असं म्हणतेय की, हा जॉब खूप सोपा आणि आरामदायक आहे. इथं कुत्री, मांजरं आणि इंटरनेटही आहे. गमतीत ती स्वत:ला कब्रस्थानची राखणदार असल्याचं म्हणते.
महिन्याला कमावते 45 हजार रुपये
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या माहितीनुसार, टॅन ही कब्रस्तानात काम करते. तिला मिळणारं मासिक वेतन हे 4000 युआन इतकं आहे. अर्थात, भारतीय चलनाप्रमाणे तिला महिन्याला 45,000 रुपये मिळतात. ती आठवड्याचे सहा दिवस काम करते. तिच्या ड्युटीची वेळ सकाळी 8:30 पासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. तसंच दिवसाचे दोन तास तिला नाश्ता-जेवणासाठी सुट्टी मिळते.
टॅनच्या टिकटॉकवर व्हायरल झालेल्या व्हिडिओजवर नेटकर्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. एका युजरने लिहिलंय की, अशा ठिकाणी नोकरी करणं हे पूर्वी अशुभ मानलं जायचं, पण पुरोगामी किंवा पुढारलेल्या लोकांना हे काम करून मानसिक शांतता मिळते. दुसर्या एक युजरने म्हटलं आहे की, गरज आणि आवड ही माणसाला कुठलीही गोष्ट करायला भाग पाडते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"