चीनच्या विशाल भिंतीबाबतच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 02:12 PM2019-11-14T14:12:07+5:302019-11-14T14:19:08+5:30
चीनची विशाल भिंत तुम्ही अनेकदा फोटोंमध्ये आणि सिनेमांमध्ये पाहिली असेल. जगातल्या ७ आश्चर्यांपैकी एक चीनच्या भिंतीबाबत अनेकांना नेहमीच उत्सुकता असते.
(All Image Credit : Instagram)
चीनची विशाल भिंत तुम्ही अनेकदा फोटोंमध्ये आणि सिनेमांमध्ये पाहिली असेल. जगातल्या ७ आश्चर्यांपैकी एक चीनच्या भिंतीबाबत अनेकांना नेहमीच उत्सुकता असते. पण अजूनही अनेकांना चीनच्या भिंतीबाबत फार माहिती नाही. चीनमधील वेगवेगळ्या शासकांनी ही भिंत परकीय आक्रमणे रोखण्यासाठी वेगवेगळ्या शासकांनी उभारली होती. असे म्हणतात की, चीनची ही भिंत २ हजार ३०० वर्ष जुनी आहे. चला जाणून घेऊ या भिंतीबाबत काही खास गोष्टी....
१) चीनचे सम्राट किन शी हुआंग यांनी सुरूवात केल्यावर ही भिंत तयार होण्यासाठी साधारण २ हजार वर्षे लागली.
२) या भिंतीचं निर्माण एका सम्राटाने केलं नाही तर अनेक सम्राट आणि राजांनी मिळून ही भिंत उभारली.
३) ही भिंत पहिल्यांदा १९७० मध्ये पर्यटकांसाठी खुली करण्यात आली होती.
४) या भिंतीची लांबी ८८५१ किमी इतकी आहे. त्यामुळेच ही भिंत जगातली सर्वात मोठी संरचना आहे.
५) ही भिंत तयार करत असताना दगड एकमेकांना जोडण्यासाठी तांदलाच्या पीठाचा वापर करण्यात आला होता.
६) ही संपूर्ण एक भिंत नाही तर छोट्या छोट्या भागांनी मिळून तयार केली आहे.
७) या भिंतींमध्ये असलेले गॅप जोडले तर या भिंतीची लांबी २१, १९६ किमी इतकी होईल.
८) या भिंतीची रूंदी इतकी आहे की, एकत्र पाच घोडस्वार किंवा १० पायदळ सैनिक एकत्र फिरू शकतात.
९) या भिंतीची उंची एकसारखी नाही. काही ठिकाणी ९ फूट उंची तर काही ठिकाणी ३५ फूट उंच आहे.
१०) चीनच्या या भिंतीला शत्रूंपासून देशाची रक्षा करण्यासाठी तयार करण्यात आले होते. पण नंतर याचा वापर परिवहन आणि वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर नेण्यासाठीही करण्यात येऊ लागला होता.
११) इतकी विशाल भिंत चंगेज खानने १२११ मध्ये तोडली होती आणि चीनवर हल्ला केला होता.
१२) चीनच्या या भिंतीचा समावेश यूनेस्कोने १९८७ मध्ये वर्ल्ड हेरिटेज यादीत केला होता.
१३) १९६०-७० च्या दशकात लोकांनी या भिंतीच्या विटा काढून स्वत:ची घरे बांधने सुरू केले होते. पण नंतर सरकारने यावर बंदी घातली होती. मात्र, चोरी तर आजही होते. येथील एका विटेला ३ पौंड किंमत मिळत असल्याचे बोलले जाते.
१४) ग्रेट वॉल ऑफ चायनाचा एक तृतीयांश भाग आता नष्ट झाला आहे. याचं कारण भिंतीची योग्य काळजी न घेणं, वातावरण बदल आणि चोरी.
१५) असे मानले जाते की, ही भिंत तयार करण्यासाठी जे मजूर मेहनत घेत नव्हते, त्यांना मारून या भिंतीत गाळले जात होते.
१६) आकडेवारीनुसार, ही भिंत तयार करण्यासाठी १० लाख लोकांनी आपला जीव गमावला होता. याच कारणाने या भिंतीला जगातली सर्वात मोठी स्मशानभूमी मानलं जातं.
१७) चीनी भाषेत या भिंतीला 'वान ली छांग छांग' असं म्हटलं जातं. याचा अर्थ होतो चीनची विशाल भिंत...
१८) जवळपास १ कोटी पर्यटक दरवर्षी ही भिंत बघण्यासाठी येतात.
१९) बराक ओबामा, रिचर्ड निक्सन, राणी एलिजाबेथ द्वितीय आणि जपानचे सम्राट अकिहितोसहीत जगभरातील ४०० नेत्यांनी ही भिंत पाहिली आहे.