झोपेत चालत 'तो' 160 किमी दूर जाऊन दुसऱ्या शहरात पोहोचला अन्...; स्लीपवॉकिंगची हटके केस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 11:24 AM2023-08-25T11:24:27+5:302023-08-25T11:45:45+5:30
एका रेल्वे ट्रॅकजवळ मायकल डिक्सन नावाचा 11 वर्षांचा मुलगा अनवाणी चालत असलेला सापडला. त्याने नाईट सूट घातला होता.
झोपेत चालण्याची सवय असलेल्या अनेक व्यक्ती आपल्या आजुबाजूला असतात. काही जण तर झोपेत चालत असताना इतके दूर जातात की त्यांना नंतर शोधूनच आणावं लागतं. अशीच एक घटना 1987 साली घडली होती आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या वेबसाईटने ही गोष्ट शेअर केली आहे. आता या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
स्लीपवॉकिंग हा शब्द स्वतःच सूचित करतो की ही एक मेडिकल कंडीशन आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला झोपेत चालण्याची सवय असते. 6 एप्रिल 1987 रोजी अमेरिकेतील इंडियाना येथील पेरू येथे एका रेल्वे ट्रॅकजवळ मायकल डिक्सन नावाचा 11 वर्षांचा मुलगा अनवाणी चालत असलेला सापडला. त्याने नाईट सूट घातला होता.
6 एप्रिलच्या पहाटे, रेल्वे क्रू मेंबर ज्याने मुलाला पाहिलं त्याने पोलिसांना बोलावलं आणि याबाबत माहिती दिली. पोलिसांनी मायकल डिक्सनला तो कुठे राहतो असं विचारलं असता तो पेरूचा नसल्याचं स्पष्ट झालं. तो डेनविले, इंडियाना येथील होता. हे ठिकाण पेरूपासून 160 किलोमीटरहून जास्त दूर होते.
स्लीपवॉकिंगच्या घटनेच्या रात्री मायकेल आईला अंथरुणावर झोपलेला दिसला होता. त्याच्या आईला माहितीप्रमाणे तो घरी सुखरूप झोपला होता. अचानक त्यांना इंडियाना पोलिसांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा विचित्र परिस्थितीत सापडला आहे.
झोपेत दुसऱ्या शहरात गेला
डिक्सन इतकं लांबचं अंतर झोपेत असताना कसं पार करू शकला? त्याच्या घराजवळच्या स्टेशनवरून मालगाडीत चढला. डॅनव्हिलमधील त्याचे घर रेल्वेमार्गाजवळ असल्याने, तो ट्रेनमध्ये झोपला आणि लांबचा प्रवास केला. त्याने मियामी काउंटी डिपार्टमेंट ऑफ वेल्फेअरमधील केसवर्करला सांगितलं की, त्याला ट्रेनमध्ये बसल्याचं आठवत नाही. त्याच्या पायावर जखमा होत्या. याशिवाय त्याला कोणतीही हानी झाली नाही.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
मायकल डिक्सनच्या या स्लीपवॉकिंगचाही दोन वर्षांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला. बॉल स्टेट डेली न्यूजमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात मायकलच्या आईने सांगितले की, स्लीपवॉक करण्याची त्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याला अनेकदा वाईट स्वप्न पडतं आणि तो झोपेत चालायला लागतो. पण तो असा कधी याआधी घराबाहेर गेलेला नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.