एका लग्नाची अनोखी गोष्ट; नवरीशिवाय निघाली नवऱ्याची वरात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 04:25 PM2019-05-13T16:25:08+5:302019-05-13T16:26:34+5:30
धुमधडाक्यात लग्न करण्याचं स्वप्न पूर्ण
साबरकांठा: गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यापासून जवळपास 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या चंपलानार गावात शुक्रवारी एक अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. लग्नाची वरात निघण्याआधी गरब्याचं आयोजन करण्यात आलं होतं. 27 वर्षांच्या अजय बारोटला हळद लावण्यात आली. शेरवानी घातलेला अजय घोडीवर बसला. या वरातीला जवळपास 200 जण उपस्थित होते. यानंतर अजयच्या घरी 800 लोकांसाठी जेवणाचं आयोजन करण्यात आलं होतं.
गुजराती परंपरेनुसार अजयचा विवाह संपन्न झाला. मात्र या लग्नात नवरी नव्हती. कारण या लग्नाचं आयोजन अजयची इच्छा पूर्ण करण्यासाठी करण्यात आलं होतं. अजयला लर्निंग डिसॅबिलिटी असल्यानं त्याला लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती. पण आपला विवाह सोहळा धुमधडाक्यात संपन्न व्हावा, अशी अजयची इच्छा होती. काही महिन्यांपूर्वीच अजयच्या चुलत भावाचा विवाह सोहळा पार पडला. त्यावेळी मोठी वरात काढण्यात आली होती. तेव्हापासून अजयनं वरात काढण्याचा हट्ट धरला.
अजयला नृत्याची आवड असल्याचं त्याचे काका कमलेश बारोट यांनी सांगितलं. 'अजय गावातल्या प्रत्येक लग्नात जातो. तिथे नृत्य करतो. फेब्रुवारीत माझ्या मुलाचं लग्न झालं. माझ्याही लग्नात अशाच प्रकारचं आयोजन करण्यात यावं, अशी अजयची इच्छा होती. माझ्या मुलाच्या लग्नानंतर तर तो हट्टाला पेटला. त्यालाही लग्न करायचं होतं. अजयचा हट्ट कमी होत असल्यानं मग संपूर्ण कुटुंबानं त्याची वरात काढण्यात निर्णय घेतला. आम्ही लग्नाच्या निमंत्रण पत्रिका छापल्या. मंत्रोच्चारासह सर्व विधी पूर्ण केले. त्यानंतर सर्वांना मेजवानी देण्यात आली,' असं कमलेश म्हणाले. त्यामुळे दिवसभर अजय अतिशय आनंदात होता. ते पाहून आम्हाला समाधान वाटलं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.