बोंबला! व्यक्तीच्या मागे लागले होते भूत, पोलिसात जाऊन नोंदवली तक्रार; वाचा काय आहे भानगड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 01:10 PM2021-06-29T13:10:18+5:302021-06-29T13:12:31+5:30
३५ वर्षीय ही व्यक्ती पंचमहनच्या जम्बुघोडा तालुक्यातील एका गावात राहतो. त्याने पोलिसांकडे तक्रार केली की, भूतांच्या एका ग्रुपने त्याचा पाठलाग केला.
(प्रातिनिधिक छायाचित्र)
जगभरात दररोज कितीतरी विचित्र गोष्टी समोर येत असतात. भारतही याबाबत मागे नाही. भारतात तर अंधविश्वासापोटी अशा घटना समोर येतात ज्यावर हसावं की रडावं हेच कळत नाही. आता हेच बघा ना गुजरातच्या पंचमहलमध्ये एक व्यक्ती रविवारी दुपारी जम्बुघोडा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. त्याचा भीतीमुळे थरकाप उडाला होता. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन भूतांविरोधात तक्रार नोंदवून घेतली आहे.
३५ वर्षीय ही व्यक्ती पंचमहनच्या जम्बुघोडा तालुक्यातील एका गावात राहतो. त्याने पोलिसांकडे तक्रार केली की, भूतांच्या एका ग्रुपने त्याचा पाठलाग केला. त्यातील दोघांनी त्याला पकडलंही होतं. पण कसातरी तो त्यांच्या तावडीतून सुटून जीव वाचवत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला.
ही व्यक्ती फार घाबरलेली होती. तो भीतीमुळे थरथरत होता. तो पोलिसांना म्हणाला की, मला भूतांपासून वाचवा. पोलिसांना त्याचं हे सांगण अर्थातच विचित्र वाटलं. पण त्याच्या समाधानासाठी पोलिसांनी त्याची तक्रार नोंदवून घेतली. पोलिसांना त्याने सांगितलं की, तो शेतात काम करत होता, त्यावेळीच भूतांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. (हे पण वाचा : बाबो! ४ कोटी किंमतीचं घर मालकाने स्वत:च पेटवून दिलं, कारण वाचून चक्रावून जाल)
पीएसआय मयंकसिंह ठाकोर यांनी सांगितलं की, रविवारी ते पावागढ येथे ड्यूटवर होते. तेव्हाच एक व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये आली. त्यानी सांगितलं की, 'तो फार अस्वस्थ होता. हे स्पष्ट होतं की, तो असामान्यपणे व्यवहार करत होता. तो फार घाबरलेला होता. त्याला शांत करण्यासाठी त्याची तक्रार लिहून घेण्यात आली'.
पोलिसांनी व्यक्तीच्या कुटुंबियांना संपर्क केला. कुटुंबियातील सदस्यांनी सांगितलं की, त्याच्यावर मानसिक उपचार सुरू होता. मात्र, त्याने गेल्या १० दिवसांपासून आपलं औषध घेतलं नव्हतं. पोलिसांनी त्याची तक्रार नोंदवून घेतली आणि त्याला घरी पाठवण्यात आलं.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सोमवारी ते या व्यक्तीसोबत बोलले. ते म्हणाले की तो पोलीस स्टेशनमध्ये यामुळे आला होता कारण त्याला विश्वास होता की, पोलीस त्याला मदत करतील. पोलीस त्याला भूतांपासून वाचवतील. पोलिसांनी त्याला सुरक्षेचं आश्वासन दिलं आणि त्याला औषधे नियमित घेण्यास सांगितलं.