CoronaVirus News: ...म्हणे आकाशातून कोसळतोय कोरोना; शहरातील जनता घरातून बाहेरच पडेना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 04:06 PM2020-05-20T16:06:09+5:302020-05-20T16:19:47+5:30
प्रशासनाला जे जमलं नाही ते गारपिटीनं करून दाखवलं; संपूर्ण शहर लॉकडाऊन
मेक्सिको: संपूर्ण जगात कोरोनानं थैमान घातलं असून बाधितांचा आकडा ५० लाखांच्या पुढे गेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन केला आहे. मात्र तरीही काही देशांमध्ये लोक लॉकडाऊनचे नियम पाळत नाहीत. मेक्सिकोमध्ये एक अजब प्रकार घडल्यानं संपूर्ण शहर आपोआप लॉकडाऊन झालं. आकाशातून कोरोना कोसळत असल्याची अफवा पसरल्यानं नागरिक घराबाहेर पडणं टाळत आहेत. त्यामुळे एका अफवेनं सगळं शहरच क्वारंटिन झाल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे.
मेक्सिकोमधल्या काही रस्त्यांवर नागरिकांना कोरोना विषाणूच्या आकाराचे बर्फाचे गोळे आढळून आले. नुइवो लेऑन राज्यातल्या भागात गारपीट झाली. आकाशातून कोसळलेले बर्फाचे गोळे कोरोना विषाणूच्या आकाराचे होते. आकाशातून कोरोना कोसळत असल्याची अफवा यानंतर सगळीकडे पसरली आणि एकच घबराट निर्माण झाली. विशेष म्हणजे अशाच प्रकारची गारपीट याआधीही शहरात झाली आहे. मात्र सध्या कोरोनाची दहशत असल्यानं सगळेच घाबरले.
सध्या सोशल मीडियावर गारपिटीचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले आहेत. संपूर्ण जगभरातल्या सोशल मीडियावर या कोरोना विषाणूच्या आकाराच्या बर्फाच्या गोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. अशा प्रकारची गारपीट अतिशय सामान्य बाब असल्याचं हवामान विभागानं सांगितलं. 'जोरदार वादळात आकारानं मोठे असलेले बर्फाचे गोळे एकमेकांवर आदळतात. त्यामुळे त्यांचा आकार बदलतो. बर्फाच्या गोळ्यांचा काही भाग टोकदार होतो,' अशी माहिती हवामानतज्ज्ञ जोस मिग्युल विनास यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांनी घरातच राहावं, बाहेर पडणं टाळावं, असं आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येतं आहे. गेल्या २४ तासांत मेक्सिकोमध्ये कोरोनाचे २ हजार ७१३ रुग्ण आढळून आले आहेत. पहिल्यांदाच मेक्सिकोमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत इतकी मोठी वाढ झाली आहे. मात्र आता मेक्सिकोमधील नागरिक घरात राहू लागले आहेत. आकाशातून कोरोना विषाणू कोसळत असल्याची अफवा पसरत असल्यानं नागरिकांनी घराबाहेर पडणं बंद केलं आहे.