नशीबाची थट्टा! घरासाठी पै पै जोडले अन् ट्रंकमध्ये ठेवले; उघडून पाहतो तर काय...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 03:03 PM2021-02-17T15:03:06+5:302021-02-17T15:09:33+5:30
स्वप्नातील घर बांधण्यासाठी त्याने घरातच पैसे जमा केले होते. जेव्हा या व्यक्तीने एक दिवस ट्रंक उघडला तर त्याने पाहिलं की, त्याच्या स्वप्नांवर पाणी फेरलं गेलं आहे.
असे म्हटले जाते की, अनेकदा मेहनत आणि प्रमाणिकपणे काम करूनही जर नशीब साथ देत नसेल तर स्वप्न पूर्ण होत नाहीत. असंच काहीसं आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील एका व्यावसायिकाने आलिशान घर बांधण्यासाठी खूप पैसा जमा केला. पण त्याने जमा केलेला इतका मोठा पैसा रद्दी जमा झालाय.
कृष्णा जिल्ह्यातील माइलवारममध्ये बिजली जमालय नावाचा व्यावसायिक डुकरं खरेदी-विक्रीचा धंदा करतो. यातून त्याला जे उत्पन्न मिळत होतं ते पैसे तो बॅंकेत नाही तर घरातच एका ट्रंकमध्ये ठेवत होता. या पैशातून त्याने स्वत:साठी एक आलिशान घर बनवण्याचं स्वप्न पाहिलं होतं.
जेव्हा या व्यक्तीने एक दिवस ट्रंक उघडला तर त्याने पाहिलं की, त्याच्या स्वप्नांवर पाणी फेरलं गेलं आहे. कारण ट्रंकमध्ये ठेवण्यात आलेल्या साधारण ५ लाख रूपयांना उदळी लागून ते पैसे रद्दीत जमा झाले आहेत. हे बघून बिजली जमालय निराश झाला. कारण तो त्याने मोठ्या मेहनतीने जमा केलेला एक एक पैसा रद्दी होताना पाहत होता. हे पैसे त्याच्या काहीच कामाचे नव्हते कारण ते फाटलेले आणि सडलेले होते.
यानंतर या व्यक्तीने विचार केला की, या नोटा आता त्याच्या कामाच्या नाही तर मुलांना खेळायला देऊ. पण इथेही त्याची नशीबाने साथ दिली नाही. लहान मुलं खऱ्या नोटांसोबत खेळत असल्याची माहिती कुणीतरी पोलिसांना दिली. पोलीस चौकशी करण्यासाठी पोहोचले तर ते सुद्धा ट्रंकमधील सडलेल्या नोटा पाहून हैराण झाले. हे पैसे ताब्यात घेऊन त्यांनी या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली.