IPS पतीसोबत राहण्यासाठी न्यायाधीश पत्नीची जबरदस्त कामगिरी; ऐकून तुम्हीही थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 06:20 PM2022-04-06T18:20:42+5:302022-04-06T18:21:00+5:30
निकिता सेंगर आणि त्यांचे पती तुहिन सिन्हा या दोघांचेही नातेवाईक लखनौमध्ये आहेत. तुहिन सिन्हा हे आंध्र प्रदेशातील आयपीएस अधिकारी आहेत
लखनौ – आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आणि कुटुंबाची साथ, या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तर एखाद्याला कुठलंही युद्ध जिंकण्यासाठी मोठी प्रेरणा देते. उत्तर प्रदेशातील एका अधिकारी दाम्पत्याने हे सिद्ध करून दाखवलं आहे. यूपीच्या हरदोई जिल्ह्यात न्यायाधीश निकिता सेंगरनं अशक्य असणारी गोष्ट केली आहे. आयुष्यात आलेले आव्हान स्वीकारून त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केले आहे.
निकिता सेंगर आणि त्यांचे पती तुहिन सिन्हा या दोघांचेही नातेवाईक लखनौमध्ये आहेत. तुहिन सिन्हा हे आंध्र प्रदेशातील आयपीएस अधिकारी आहेत. दोघंही पती-पत्नी वेगवेगळ्या राज्यात नोकरी करत असल्याने त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. वैवाहिक आयुष्यात पतीसोबत राहण्याची स्वप्न बाळगणाऱ्या न्या. निकिता सेंगर यांनी जे केले ते ऐकून तुम्हीही कौतुक कराल. निकिता यांनी सुरुवातीला तेलगू भाषा शिकली. त्यानंतर आंध्र प्रदेशातील न्यायिक सेवा परीक्षा दिली होती.
या परिक्षेत यशस्वी होतानाच निकिता सेंगर यांनी चौथा क्रमांक मिळविला. आता त्या लवकरच उत्तर प्रदेशमधून राजीनामा देणार असून आंध्र प्रदेशात नोकरी करून पतीसोबत राहणार आहे. निकिता आणि तुहीन सिन्हा या दोघांनी पुणे येथील आयएलएस लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. यानंतर दोघेही नागरी सेवेची तयारी करू लागले. निकिताने उत्तर प्रदेश न्यायिक सेवा २०१८ ची परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर निकिता सेंगरला हरदोई येथे दिवाणी न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले. त्याचवेळी तुहीन सिन्हा यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन आंध्र प्रदेशमध्ये आयपीएस म्हणून नोकरीला सुरुवात केली. दोघांनी २०२१ मध्ये लग्न केले.
बदली होत नसल्याने बनवलं ध्येय
लग्नानंतर दोघांचेही एकत्र राहणे शक्य नव्हते. तुहीन सिन्हा यांनी कॅडर बदलण्याची शक्यता नव्हती. यानंतर निकिता तेलगू भाषा शिकली. त्यानंतर आंध्र प्रदेश न्यायिक सेवेची परीक्षा दिली. जिथे त्याला मोठे यश मिळाले आणि चौथे स्थान मिळाले. आता निकिता उत्तर प्रदेश न्यायिक सेवेचा राजीनामा देईल आणि आंध्र प्रदेशात नोकरी सुरू करेल.