Video: प्रोफेसरनं मुलींना प्रेमाचं गणित शिकवलं; कॉलेजनं घरी बसवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 11:07 AM2019-03-20T11:07:58+5:302019-03-20T11:09:30+5:30
लव्ह फॉर्म्युला शिकवणाऱ्या प्राध्यापकांचं कॉलेजकडून निलंबन
कर्नाल: मुलींच्या महाविद्यालयात लव्ह फॉर्म्युला शिकवणं एका प्राध्यापकाला चांगलंच महागात पडलं. संबंधित प्राध्यापकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाविद्यालयानं प्रकरणाची गंभीर दखल घेतली. प्राध्यापकानं घडलेल्या प्रकाराबद्दल विद्यार्थ्यांची माफी मागितली. मात्र त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
हरयाणाच्या कर्नालमधील मुलींच्या महाविद्यालयातील गणिताचे प्राध्यापक चरण सिंह यांनी वर्गात 'फॉर्म्युला ऑफ लव्ह' शिकवला. प्राध्यापकांनी हा फॉर्म्युला फळ्यावर लिहून तो विद्यार्थिनींना अगदी व्यवस्थित समजावून सांगितला. त्यावेळी एका विद्यार्थिनीनं हा संपूर्ण प्रकार चित्रीत केला. तिनं हा व्हिडीओ प्राचार्यांना दाखवला. यानंतर प्राध्यापकांनी विद्यार्थिनींची माफी मागितली. मात्र महाविद्यालय प्रशासनानं त्यांना निलंबित केलं.
'जवळीक - आकर्षण = मैत्री', 'जवळीक + आकर्षण = रोमँटिक प्रेम', 'आकर्षण - जवळीक = क्रश' अशी सूत्रं चरण सिंह यांनी विद्यार्थिनींना शिकवली. या सूत्रांमधील प्रत्येक शब्द त्यांनी मुलींना हिंदीत समजावून सांगितला. वय वाढल्यानंतर पती-पत्नी यांना एकमेकांविषयी वाटणारं आकर्षण कमी होतं आणि ते परस्परांचे मित्र होतात, असा दावा सिंह यांनी केला. सिंह प्रेमाची सूत्रं समजावून सांगत असताना वर्गात एकच हशा पिकला होता.