गर्लफ्रेण्डला लाँग ड्राइव्हवर घेऊन जायला त्याने चोरल्या 16 बाईक्स
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 01:16 PM2017-08-24T13:16:15+5:302017-08-24T14:10:57+5:30
बंगळुरू, दि. 24- प्रेमामध्ये सगळं काही माफ असतं असं म्हणतात. तसंच आपलं प्रेम सिद्ध करण्यासाठी कुठल्याही थराला जातात याची अनेक उदाहरण आपण पाहतो. तसाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. आपल्या गर्लफ्रेण्डला लाँग ड्राइव्हवर घेऊन जाण्यासाठी एका 24 वर्षीय मुलाने चक्क 16 बाईक्सची चोरी केल्याचं समोर आलं आहे. के.जी नगर पोलिसांनी एका व्यक्तीकडून 16 बाईक्स ताब्यात घेतल्या.
सराबंदेपाल्या भागात राहणाऱ्या वासिम अक्रम या चोवीस वर्षीय तरूणाकडून पोलिसांनी या 16 बाईक्स जप्त केल्या. आपल्या गर्लफ्रेण्डला खूश करण्यासाठी हा सगळा प्रकार करत असल्याचं त्याने कबूल केलं. गेल्या वर्षभरापासून वासिम गाड्यांची चोरी करत होता. त्याच्या गर्लफ्रेण्डला लाँग ड्राइव्हर नेण्यासाठी तो बाईक्सची चोरी करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आपण ज्या गाडीवरून फिरत आहोत ती गाडी चोरीची आहे, याची कल्पना वासिमच्या गर्लफ्रेण्डला नव्हती, असंही पोलिसांनी सांगितलं.
गर्लफ्रेण्डला फिरविण्यासाठी चोरी करण्याचा हा प्रकार उघड झाल्यानंतर असाच आणखी एक प्रकार समोर आला. बाईक स्टंटची आवड पूर्ण करण्यासाठी काही जण गाड्यांची चोरी करत असल्याचं समोर आलं आहे. रागीगुड्डा झोपडपट्टीत राहणारे रणजीत इलंगोवन आणि मार्टीमुत्तू मुलीस्वामी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना 2015 साली पहिल्याच वर्षात नापास झाले. त्यानंतर त्या दोघांनी कॉलेज सोडलं होतं. तेव्हापासून ते दोघं गाड्या चोरी करत होते, अशी माहिती मिळते आहे. त्या दोघांनी शहरातील विविध भागातून 25 गाड्यांची चोरी केली आहे.
काही दिवसांपूर्वी जयानगर परिसरात काही मुलं बाईक स्टंट करत असल्याची माहिती काही स्थानिकांनी पोलिसांना दिली होती. स्थानिकांच्या माहितीनुसार पोलीस घटनास्थळी पोहचल्यावर त्या दोघांनी तेथून पळ काढला. चोरीच्या झालेल्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने पोलिसांना त्या दोघांची ओळख पटली होती. चौकशी दरम्यान त्या दोघांनीही चोरी केल्याचं कबूल केलं. बाईकची चोरी करून स्टंट करायचे आणि नंतर परत ती बाईक नेऊन ठेवायची, अशी आम्हाला सवय असल्याचं त्या दोघांनी सांगितलं.