सूर्यापेक्षा 33 पट मोठे, पृथ्वीच्या जवळ...शास्त्रज्ञांनी शोधले सर्वात मोठे 'ब्लॅक होल', पाहा video...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 04:16 PM2024-04-16T16:16:24+5:302024-04-16T16:17:23+5:30
Heaviest Black Hole In Milky Way: हे ब्लॅक होल पृथ्वीपासून अवघ्या 2,000 प्रकाशवर्षे अंतरावर आहे.
Biggest Black Hole In Our Galaxy: या विश्वातील सर्वात रहस्यमय गोष्टींपैकी एक म्हणजे 'ब्लॅक होल'. खगोलशास्त्रज्ञ गेल्या अनेक वर्षांपासून या ब्लॅक होलचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत. जवळ येणाऱ्या कुठल्याही वस्तुला गिळणारा हा 'काळा राक्षस' प्रत्येक आकाशगंगेत असतो. अशातच, खगोलशास्त्रज्ञांनी आपल्या आकाशगंगेतील सर्वात मोठा 'स्टेलर ब्लॅक होल' शोधले आहे. हे ब्लॅक होल पृथ्वीपासून अवघ्या 2,000 प्रकाशवर्षे अंतरावर आहे. BH3 नावाच्या या 'ब्लॅक होल'चे वस्तुमान आपल्या सूर्यापेक्षा 33 पट जास्त आहे.
कसा लागला शोध?
आकाशगंगेतील मोठ्या ताऱ्यांचा स्फोट होतो, तेव्हा अशाप्रकारचे 'ब्लॅक होल' तयार होतात. आपल्या आकाशगंगेत डझनभर 'ब्लॅक होल' आहेत. या सर्वांचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या 10 पट आहे. पण, आता सापडलेला BH3 ब्लॅक होल या सर्वांपेक्षा मोठा आहे. दरम्यान, युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) च्या Gaia Space Observatory ने BH3 ब्लॅक होलचा शोध लावला आहे. खगोलशास्त्रज्ञांना 'अकीला' नक्षत्रातील एका ताऱ्याच्या परिभ्रमणात 'लवचिकता' आढळली. थोडे अधिक संशोधन केल्यावर असे आढळून आले की, हा तारा एका महाकाय 'ब्लॅक होल'भोवती फिरतोय.
2/ Called BH3, the #BlackHole was discovered by @ESAGaia 🛰️ because it imposes an odd wobbling motion on the star orbiting it ⭐️⚫️
— ESO (@ESO) April 16, 2024
Ground-based telescopes, including ESO’s #VLT 🔭, then found its mass to be 33 times that of the Sun.
Artist’s animation of the system 👇 pic.twitter.com/doLuUZg9k9
शास्त्रज्ञांना बसला धक्का
BH3 हे आकाशगंगेत सापडलेले आतापर्यंतचे सर्वात मोठे 'स्टेलर ब्लॅक होल' आहे. याचा शोध इतका महत्त्वाचा होता की, शास्त्रज्ञांनी तात्काळ त्याची माहिती जगाला दिली. आता याद्वारे इतर देशांतील खगोलशास्त्रज्ञांना BH3 ब्लॅक होलवर संशोधन करता येणार आहे. BH3 ब्लॅक होलचे पृथ्वीच्या अतिशय जवळ असणे शास्त्रज्ञांना चकीत करत आहे.
Sagittarius A* तुलनेत हे काहीच नाही
BH3 हे आपल्या आकाशगंगेतील सर्वात मोठे स्टेलर ब्लॅक होल असले तरी, Sagittarius A* सर्वात मोठे ब्लॅक होल आहे. हे सूर्याच्या वस्तुमानाच्या चार दशलक्ष पट आहे. Sagittarius A* आकाशगंगेच्या अगदी मध्यभागी असून, हे ताऱ्याच्या स्फोटाने तयार झाले नसून, धूळ आणि वायुने तयार झाले. दरम्यान, BH3 चा शोध खुप महत्वाचा मानला जातोय, कारण हा पृथ्वीच्या अगदी जवळ आहे.