भारीच राव! फक्त एक महिना झोप काढण्याचे मिळणार तब्बल 26 हजार रुपये; जाणून घ्या, नेमकं कसं?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 03:26 PM2022-04-25T15:26:25+5:302022-04-25T15:27:48+5:30
आरामात झोप काढण्यासाठी महिन्याला तब्बल 26 हजार रुपये मिळत असल्याची जाहिरात सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे.
झोप ही सर्वांनाच अत्यंत प्रिय असते. काम करताना अनेकदा झोप येते. पण तुम्हाला जर कोणी भरपूर झोप काढण्याचे पैसे मिळतील असं सांगितलं. तर सुरुवातीला तुमचा विश्वासच बसणार नाही. हे खोटं वाटेल. पण हो हे खरं आहे. आरामात झोप काढण्यासाठी महिन्याला तब्बल 26 हजार रुपये मिळत असल्याची जाहिरात सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे. मलाया विद्यापीठाच्या (University Of Malaya) काही संशोधकांनी खास झोपाळू आणि आळशी लोकांना एक ऑफर दिली.
रिसर्चमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना फक्त झोप काढण्याचं बक्षीस म्हणून 26 हजार रुपये देत आहेत. मलाया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या अभ्यासाशी संबंधित एक पोस्टर व्हायरल होत आहे. कारण, त्यात स्पष्टपणे लिहिलंय की, त्यांच्या संशोधनात सहभागी झालेल्या लोकांना फक्त झोप घेण्याचं काम करावं लागतं आणि दुसरं काही करायचं नाही. त्या बदल्यात, त्याला मलेशियन चलनात 1,500 मिळतील, जे भारतीय चलनानुसार 26,500 रुपये आहेत.
20 ते 40 वयोगटातील लोकांसाठी ऑफर
या रिसर्चमध्ये सहभागी असलेल्या लोकांसाठी काही पात्रता देखील निश्चित करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, सहभागींचे वय 20 ते 40 च्या दरम्यान असावं आणि त्यांचं वजन सरासरी असावं. याचं कारण म्हणजे त्यांना खास स्लीप हाऊस बॅगमध्ये झोपावं लागतं. अभ्यासात सहभागी असलेल्या लोकांना महिनाभर घरी झोपावं लागेल आणि त्यांची देखरेख केली जाईल. झोपेची कोणतीही वेगळी स्थिती आढळल्यास, सहभागींना त्यात समाविष्ट केलं जाणार नाही. वर्ल्ड ऑफ बझच्या मिस सैफाच्या मते, स्वयंसेवकांना स्लीपींग हाऊसमध्ये पाठवण्यापूर्वी त्यांची तपासणी केली जाईल. त्यानंतरच त्यांना त्यात समाविष्ट केलं जाईल.
30 रात्रीच्या झोपेसाठी 26 हजार 500 रुपये
एकदा ते स्क्रिनिंग पास झाल्यानंतर, लोकांना स्लीपींग हाऊसमध्ये झोपण्यासाठी पाठवलं जाईल. त्यांना 30 रात्री झोपावं लागणार असून त्याबदल्यात त्यांना 26 हजार 500 रुपये मिळतील. संशोधकांनी त्याची जाहिरात करताच, इंटरनेटवर लोक या जाहिरातीवर तुटून पडले. परिस्थिती अशी बनली की, जाहिरात व्हायरल झाल्यानंतर संशोधकांना त्यांची नोंदणी थांबवावी लागली. 2017 मध्येही फ्रान्सच्या इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस मेडिसिन अँड सायकॉलॉजीने, लोकांना अशाच पद्धतीने 3 महिने बेडवर झोपण्यासाठी 11.2 लाख रुपये ऑफर केले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.