'हॅलो फ्रॅण्ड्स चाय पिलो' बोलणाऱ्या भाभीचा सोशल मीडियावर धुमाकूळ, जाणून घ्या ती महिला आहे तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 12:44 PM2018-06-18T12:44:25+5:302018-06-18T12:44:25+5:30
सोशल मीडियावर नेटिझन्सकडून या महिलेची तुफान खिल्ली उडविली जाते आहे.
मुंबई- सध्याच्या इंटरनेटच्या युगात एखादी गोष्ट काही सेकंदात व्हायरल होते. एखादा डायलॉग, डान्स किंवा मेम व्हायरल व्हायला एक सेंकदही पुरेसा आहे. आपल्या हटके स्टाईलने गाणं गाणारी ढिन्चॅक पूजा, गोविंदाच्या गाण्यावर बेभान होऊन नाचणाने डब्बू अंकल या दोघांच्या व्हिडीओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असताना आता एका महिलेचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर नेटिझन्सकडून या महिलेची तुफान खिल्ली उडविली जाते आहे. ही महिला हातात चहाचा ग्लास घेऊन 'हॅलो फ्रॅण्ड्स चाय पिलो, पापे खालो' बोलताना व्हिडीओमध्ये पहायला मिळते आहे. एका व्हिडीओवर न थांबता या महिलेने अनेक व्हिडीओ पोस्ट केले आहेत. कलिंगड, फ्रुटी, पनीर असे पदार्थ घेऊन या महिलेने व्हिडीओ पोस्ट केले आहेत.
या व्हिडीओचा वापर करत अनेकांनी विनोदी व्हिडीओ तयार करून पोस्ट केले आहेत. हे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
कोण आहे ही महिला?
सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या या महिलेचं नाव सोमवती महावर आहे. ही महिला नेमकी कुठली रहाणारी आहे याबद्दची माहिती अजून समोर आलेली नाही.
मुंबई पोलिसांचं ट्विट?
या ट्रेंडमध्ये असलेल्या व्हिडिओचा वापर करून मुंबई पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे.हेल्मेटचं महत्त्व समजावून सांगताना त्यांनी महावर यांचा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यांच्या ‘चाय पिलो’ला वेगळ्या प्रकारे मांडत त्यांनी हेल्मेट घालण्याचं महत्त्व समजावून सांगितलं आहे. ‘हाय फ्रेंड हेल्मेट पहन लो, to have a Safe-Tea at home!’ असा संदेश त्यांनी लिहिला आहे.
Hello Fraaands! Helmet pehan lo... to have a Safe-Tea at home! #RoadSafeTEApic.twitter.com/MoGTYzK8wU
— Mumbai Police (@MumbaiPolice) June 13, 2018