100 किलो भांग खाऊन मेंढ्या झाल्या 'टल्ली' आणि मग झालं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 03:27 PM2023-09-28T15:27:49+5:302023-09-28T15:28:05+5:30
खाण्यासाठी ताजं गवत शोधण्याच्या नादात मेंढ्यांच्या एका कळपाने भांगेचं पिक खाऊन टाकलं. ज्यानंतर त्यांचं वागणंच बदललं.
मनुष्य असो वा प्राणी जेव्हा ते उपाशी असतात तेव्हा सीमा पार करताना दिसतात. ग्रीसमधून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे काही मेंढ्यांनी गवत समजून भांग खाल्ली आणि त्यानंतर शहरात जे झालं ते बघून लोक हैराण झाले. ग्रीसमध्ये भयंकर पूर आला आहे. मनुष्यांसोबतच जनावरेही प्रभावित झाले आहेत. खाण्यासाठी ताजं गवत शोधण्याच्या नादात मेंढ्यांच्या एका कळपाने भांगेचं पिक खाऊन टाकलं. ज्यानंतर त्यांचं वागणंच बदललं.
उपासमारीमुळे मेंढ्यांचा एक कळप औषधी भांग उप्तादन करणाऱ्या एका ग्रीनहाऊसमध्ये शिरला आणि त्यांनी भांगेचा बराच माल खाल्ला. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.
एका वेबसाइटनुसार, अल्मिरोस शहराजवळच्या ग्रीनहाऊसमध्ये 100 किलो भांग खाणाऱ्या मेंढ्यांचा हा कळप ग्रीसच्या थिसलीमध्ये पूरग्रस्त भागात चाऱ्याच्या शोधात दिसला होता.
वेबसाइटसोबत बोलताना शेतकऱ्याने सांगितलं की, घटनेनंतर त्याला हे समजलं नाही की, मेंढ्यांच्या या कृत्यावर त्याने हसावं की रडावं. तो म्हणाला की, आधीच पिकाचं मोठं नुकसान झालं होतं. अजून स्थिती बरोबर नाही अशात मेंढ्यांनी जे काही शिल्लक होतं तेही खाल्लं.
भांग खाण्याचा परिणाम या मेंढ्यांवर झाला. मेंढ्यांची देखरेख करणारा म्हणाला की, भांग खाल्ल्यापासून मेंढ्या 'खूश' आहेत. त्या मस्ती करताना दिसत आहेत. त्यांना सगळीकडे सगळं सुंदर दिसत आहे. शेतकऱ्याने सांगितलं की, भांग खाल्ल्यानंतर मेंढ्या जोरजोरात उड्या मारत होत्या. सामान्यपणे त्या असं करत नाही. असं फार कमी बघायला मिळतं.