येथे ‘कर’ माझे जुळती

By admin | Published: October 26, 2016 07:40 AM2016-10-26T07:40:50+5:302016-10-26T07:40:50+5:30

अपंगांचे जगणे सुसह्य व्हावे, यासाठी मागील कित्येक वर्षांपासून विविध उपक्रम राबवणाऱ्या ‘रोटरी क्लब ऑफ कल्याण’ आणि ‘जैन चॅरिटेबल ट्रस्ट’ने यंदा १३ नोव्हेंबरला कृत्रिम हात दानाचा उपक्रम हाती घेतला आहे

Here 'my' match with 'tax' | येथे ‘कर’ माझे जुळती

येथे ‘कर’ माझे जुळती

Next
>आमोद काटदरे / ऑनलाइन लोकमत
‘रोटरी’, ‘जैन ट्रस्ट’चा पुढाकार : कल्याणमध्ये १३ नोव्हेंबरला शिबिर
ठाणे, दि. 26 - अपंगांचे जगणे सुसह्य व्हावे, यासाठी मागील कित्येक वर्षांपासून विविध उपक्रम राबवणाऱ्या ‘रोटरी क्लब ऑफ कल्याण’ आणि ‘जैन चॅरिटेबल ट्रस्ट’ने यंदा १३ नोव्हेंबरला कृत्रिम हात दानाचा उपक्रम हाती घेतला आहे. खांद्यापासून खालील हात नसलेल्यांसाठी तसेच कोपरापासून खाली हात नसलेल्यांना ‘एल एन ४’ हा कृत्रिम हात पूर्णत: मोफत बसवून त्यांना स्वावलंबी करण्याचा निर्धार दोन्ही संस्थांच्या सदस्यांनी केला आहे. या शिबिरासाठी राज्यासह परराज्यातील ३२५ रुग्णांनी नोंदणी केली आहे.
 
कल्याणमधील रोटरी क्लबने मागील वर्षी त्यांच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त पाय नसलेल्यांसाठी जयपूर फूट तर पाय लुळे पडलेल्यांसाठी कॅलिपर बसवण्याचा उपक्रम राबवला. कल्याण तालुक्याबरोबरच शेजारील मुरबाड, वाडा, हाजीमलंग आदी परिसरात त्यांनी या शिबिरासाठी जागृती केली होती. त्यासाठी ग्रामीण भागात बाजारांच्या दिवशी पोस्टर, बॅनर लावले होते. तसेच काही ठिकाणी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून या शिबिरासाठी जागृती केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने २१० रुग्णांना स्वत:च्या पायावर उभे करण्यात रोटरी आणि जैन चॅरिटेबल ट्रस्टला यश आले. या शिबिराच्या वेळी हात नसलेले अपंगही या संस्थांच्या संपर्कात आले. त्यामुळे त्यांनी यंदाच्या वर्षी हात नसलेल्या अपंगांना हात बसवण्याचा उपक्रम राबवण्याचे ठरविले. 
 
कल्याणच्या रोटरी क्लबने कृत्रिम हात मिळवण्यासाठी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी त्यांना ‘रोटरी क्लब आॅफ पिनाया बेंगलोर’ आणि ‘रोटरी क्लब ऑफ पुणे नॉर्थ डाऊन टाऊन’ हे काम करत असल्याचे समजले. जुलैमध्ये कल्याण रोटरीचे अध्यक्ष दिलीप घाडगे, प्रोजेक्ट मार्गदर्शक केदार पोंक्षे, प्रोजेक्ट-चेअरमन मदन शंकलेशा, प्रोजेक्ट संयोजक डॉ. सुश्रुत वैद्य, सेक्रेटरी चंद्रकांत बागरेचा, प्रोजेक्ट-विस्तारक प्रवीण कुलकर्णी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पुण्यातील रोटरीचे साबीरभाई जामनगरवाला यांची भेट घेतली. तेव्हापासून शिबिराचे नियोजन सुरू झाल्याचे पोंक्षे यांनी सांगितले. 
 
कृत्रिम हात दानाच्या शिबिरासाठी पुन्हा मागील वर्षाप्रमाणे प्रत्येक सदस्याने कल्याण तालुक्याबरोबर लगतच्या परिसरात जागृती केली. व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियामुळेच ८० टक्के लाभार्थी संपर्कात आल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रातील जालना, कराड, कोल्हापूर बरोबरच कर्नाटक, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, दिल्ली येथील ३२५ अपंगांनी नोंदणी केली आहे. औद्योगिक कंपन्या तसेच शेतीत काम करताना झालेल्या अपघातामुळे काहींच्या हाताला इजा झाली; तर सात-आठ लहान मुलांनीही नोंदणी केली आहे. त्यांचे हात जन्मत:च अधू आहेत. कल्याणच्या ठाणकर पाड्यातील आग्रा रोडवरील महावीर जैन इंग्लिश स्कूलमध्ये १३ तारखेला होणाऱ्या शिबिरात त्यांना कृत्रिम हात बसवले जाणार आहेत.
 
अमेरिकेतील एलन मिडोज प्रॉस्थेटिक हँड फाऊंडेशनतर्फे जगभरातील गरजूंना कृत्रिम हातांचे वितरण केले जाते. कोपराखाली हात नसलेल्यांसाठी ‘एल एन ४’ हा कृत्रिम हात बसवला जातो. तो काढायला-लावायला अगदी सोपा-सुटसुटीत, मजबूत, टिकाऊ आणि बहुपयोगी आहे. ब्रास आणि स्टेनलेस स्टीलचे भाग वापरून उच्च दर्जाच्या प्लास्टिकपासून तो बनवलेला आहे. पाणी, धूळ, क्षार, उष्णता यांना दाद न देणारा हा हात साध्या पाण्यानेही साफ करता येतो. विशेष म्हणजे, अंदाजे ११-१२ किलो वजनही उचलण्याची या हाताची क्षमता आहे. या हाताची तीन बोटे स्थिर आहोत, तर दोन बोटे हलणारी आहेत. या हातावरील एक बटन दाबल्याने ही बोटे मिटण्याची-उघडण्याची क्रिया होते. ही बोटे एकमेकांत बसून वस्तू घट्ट पकडू शकतात. तसेच लिहिणे, सायकल-मोटरसायकल, कार चालवणे, हलके वजन उचलणे यासारखी कामेही करणे सहज शक्य आहे. या हाताचे वजन ४०० ग्रॅम आहे.
 
खांद्याखाली हात नसलेले ७० अपंगांनी या शिबिरासाठी नोंदणी केली आहे. त्यांना माहीममधील डिस्ट्रिक्ट डिसअ‍ॅबिलिटी रिहॅबिलिटेशन सेंटरच्या माध्यमातून हात उपलब्ध करून दिला जाणार आहे. ही संस्था उदयपूरची असून मापाप्रमाणे हात बनवून देते. त्यासाठी लाभार्थींच्या हाताचे माप घेतल्याचे पोंक्षे यांनी सांगितले. पुणे रोटरीचे १० सदस्य शिबिराच्या आदल्या दिवशी येऊन कल्याण रोटरीच्या सदस्यांना ‘एल एन ४’ हात बसवण्याचे प्रशिक्षण देणार आहेत. त्यानुसार १३ तारखेला सकाळी ८ पासून लाभार्थींना हे हात बसवले जातील. हात नसलेल्यांना स्वावलंबी करण्याचा मुख्य उद्देश असल्याचे पोंक्षे व डॉ. वैद्य म्हणाले.
 

Web Title: Here 'my' match with 'tax'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.