मुस्लिम जवान नमाज अदा करत असताना हिंदू जवानाचा कडेकोट बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 10:53 AM2017-07-31T10:53:26+5:302017-07-31T10:55:27+5:30
आपल्या मुस्लिम धर्मीय सहका-याच्या नमाजमध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सहकारी जवान सशस्त्र उभा राहून पुरेपूर काळजी घेत असल्याचं फोटोत दिसत आहे
श्रीनगर, दि. 31 - जम्मू काश्मीरमध्ये हिंसक जमावाकडून वारंवार हल्ले होत असतानाही जवान मात्र आपल्या कर्तव्यापासून मागे हटताना दिसत नाहीत. ज्या जमावाकडून किंवा नागरिकांकडून हल्ले होत असतात त्यांच्याच सुरक्षेसाठी जवान आपल्या जिवाची बाजू लावताना दिसतात. अशावेळी आपला धर्म, जात सगळ्या पलीकडे जाऊन हे जवान कर्तव्य बजावताना दिसत असतात. मुळात सैन्यात भरती होतानाच हिंदू किंवा मुस्लिम नाही तर या देशाचा एक नागरिक म्हणून जवान लष्करात दाखल होत असतो. आणि अनेकवेळा आपल्या कामगिरीतून देशाप्रती असलेलं आपलं प्रेम ते दाखवत असतात. अशावेळी आपली संस्कृती, शिकवणही जवान विसरत नसतात, ज्याची प्रचिती आणणारा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.
या फोटोमध्ये सीआरपीएफचा मुस्लिम धर्मीय जवान नमाज अदा करत असताना त्याच्या सुरक्षेसाठी हिंदू धर्मीय जवान तैनात असल्याचं दिसत आहे. आपल्या मुस्लिम धर्मीय सहका-याच्या नमाजमध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सहकारी जवान सशस्त्र उभा राहून पुरेपूर काळजी घेत असल्याचं फोटोत दिसत आहे. सीआरपीएफच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. ‘शांतीसाठी सशस्त्र बंधूत्व’ (Brothers-in-arms for peace) अशी कॅप्शन या फोटोलो देण्यात आली आहे.
"Brothers-in-arms for peace" - CRPF Srinagar pic.twitter.com/QfsOIKbHoa
— Srinagar Sector CRPF (@crpf_srinagar) July 29, 2017
जम्मू काश्मीरमध्ये धर्माच्या नावाखाली तरुणांना दहशतवादाकडे वळवलं जात आहे. सतत तणावात असणा-या काश्मीर खो-यामधील या फोटोमुळे एक वेगळी बाजूही लोकांसमोर आली असून त्यांना खूपच भावली आहे. धर्माच्या नावाखाली आपापसांत शत्रुत्व निर्माण करणा-यांना हे एक चोख उत्तर असल्याचं काहीजणांनी म्हटलं आहे.