अरे व्वा! झोपा काढा, लाखो रुपये जिंका; सलग 100 दिवस 9 तास झोपली तरुणी अन् 6 लाख जिंकली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 12:31 PM2022-09-07T12:31:16+5:302022-09-07T12:34:24+5:30
"लहानपणापासूनच मला झोपण्याची खूप आवड आहे. जेव्हाही मला झोप येते, तेव्हा मी बिनधास्तपणे झोप काढते."
झोपा काढायला अनेकांना आवडतं. तुम्हाला झोपेचे कोणी पैसे दिले असं सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. फक्त झोपून एका तरुणीने लाखो रुपये कमावल्याची घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील (West Bengal) श्रीरामपूर, हुगळी येथे राहणाऱ्या एका तरुणीने झोपण्याच्या स्पर्धेत बाजी मारली आहे. तब्बल सलग 100 दिवस 9 तास झोपून विक्रम करत ही स्पर्धा जिंकली. सर्वांत जास्त वेळ झोपून राहणाऱ्या तरुणीला 6 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. या स्पर्धेत 4.5 लाख स्पर्धक सहभागी झाले होते.
त्रिपर्णा असं या तरुणीचं नाव असून तिने सर्वोत्कृष्ट स्लीपर किताब पटकावला आहे. 4.5 लाख स्पर्धकांमधून तिने हा पुरस्कार प्राप्त केला. अखिल भारतीय स्तरावर अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केली जात असल्याचे ऑनलाईन वेबसाइटद्वारे मला कळाले. त्यानंतर मी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज केला. कारण लहानपणापासूनच मला झोपण्याची खूप आवड आहे. जेव्हाही मला झोप येते, तेव्हा मी बिनधास्तपणे झोप काढते. अनेकवेळा मला परीक्षेच्या वेळीही झोप आली होती असं त्रिपर्णाने म्हटलं आहे.
झोपण्याच्या या अनोख्या स्पर्धेसाठी देशभरातून एकूण 4.5 लाख अर्ज आले होते. ज्यामध्ये 15 स्पर्धकांची निवड करण्यात आली. त्यातून फायनलसाठी 4 जणांची निवड करण्यात आली. यात त्रिपर्णाने बाजी मारली. तिने सलग 100 दिवस 9 तास झोपून विक्रम केला. स्पर्धा जिंकल्याबद्दल तिला 6 लाखांचं बक्षीसही मिळाले आहे. तिला प्रत्येकी एक लाख रुपयांचे सहा चेक देण्यात आले.
त्रिपर्णा अमेरिकेतील एका कंपनीत काम करते. सध्या तिचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे. कामासाठी तिला रात्री झोपेतून उठावं लागतं. ज्याची भरपाई ती दिवसभर झोपून करते. 6 लाख रुपयांचं बक्षीस मिळाल्यामुळे त्रिपर्णाला खूप आनंद झाला. या रकमेतून आवडीच्या आणि गरजेच्या वस्तू खरेदी करणार असल्याचंही तिने सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.