किती वर्षं झाली तुम्ही लांडगा पाळत आहात?; शास्त्रज्ञांच्या रिपोर्टनं नवा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 06:13 AM2022-07-08T06:13:29+5:302022-07-08T06:13:48+5:30

१५,००० वर्षांपासून लोक पाळताहेत लांडगे! संशोधकांना कुत्र्यांमध्ये प्राचीन लांडग्यांच्या दोन भिन्न प्रजातींचे डीएनए सापडले आहेत. 

How many years have you been keeping wolves ?; Scientists report new revelation | किती वर्षं झाली तुम्ही लांडगा पाळत आहात?; शास्त्रज्ञांच्या रिपोर्टनं नवा खुलासा

किती वर्षं झाली तुम्ही लांडगा पाळत आहात?; शास्त्रज्ञांच्या रिपोर्टनं नवा खुलासा

Next

किती वर्षं झाली तुम्ही लांडगा पाळता आहात? कदाचित तुम्ही जरी लांडगा पाळला नसेल, तरी तुमच्या आजूबाजूला, शेजारी, गल्लीत, परिसरात अनेक जण लांडगा पाळताना दिसतातच. लहान मुलांना तर लांडग्याशिवाय होतच नाही. लांडगा आवडत नाही, असा लहान मुलगा शोधूनही सापडणार नाही. त्यामुळंच लहान मुलं नेहमीच आपल्या पालकांकडं लांडगा पाळायचा हट्ट धरत असतात... आणि केवढे ते लांडग्याचे लाड! बरेच जण तर आपल्या सख्ख्या मुलाचे, स्वत:च्या बाळाचे करीत नसतील एवढे लाड लांडग्याचे करतात. त्याला स्वत:च्या हातानं न्हाऊ-माखू घालणं काय, त्याला आपल्या सोबत बेडवर घेऊन झोपणं काय, त्याला गाडीतून फिरवणं काय..! खुद्द लांडग्यांच्या आईबापांनी केले नसतील एवढे लाड आपण त्यांचे करतो..! तुम्ही म्हणाल, मघापासून  काय एवढं लांडगेपुराण लावलंय? तुम्ही कोणाला कधी लांडगा पाळताना पाहिलंय? तुमच्या डोक्याचा स्क्रू निसटलाय का..? तम्हाला कुत्रा म्हणायचंय काय? मग लांडगा का म्हणताय..?

नाही मित्रांनो, यात काही गल्लत झालेली नाही. इथे कुत्रा नाही, लांडगाच म्हणायचंय... त्याचं कारणही तसंच आहे. कारण शास्त्रज्ञांनीच तसं सिद्ध केलंय. त्यांच्या मते कुत्रा हा प्राणी कधी अस्तित्वातच नव्हता! होता आणि आहे तो लांडगा. या लांडग्याचाच नंतर कुत्रा झाला! 
शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, हजारो वर्षांपूर्वी माणसं आणि लांडगे यांचं अस्तित्व आहे. आधी मानव आणि लांडगे हे दोन्ही प्राणी वेगवगळे राहत होते; पण कालांतरानं अनेक कारणांनी या दोन्ही प्रजाती एकमेकांच्या जवळ आल्या आणि त्यांचं सहअस्तित्व वाढलं. सुमारे १५,००० वर्षांपूर्वी माणसानं आपल्या सान्निध्यात आलेल्या या जंगली लांडग्याला पाळायला सुरुवात केली. हळूहळू तो माणसाळत गेला. पंधरा हजार वर्षांपूर्वीचा हा लांडगा म्हणजेच आज आपल्याला घरोघरी आणि गल्लोगल्ली दिसणारा, अनेक जण ज्याला हौसेनं पाळतात, तो कुत्रा!
यासाठी शास्त्रज्ञांनी व्यापक संशोधन केलं आणि त्यातून नुकताच हा निष्कर्ष काढला आहे. ‘नेचर’ या जर्नलमध्ये अलीकडेच हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे. गेल्या सुमारे एक लाख वर्षांत युरोप, सायबेरिया आणि उत्तर अमेरिकेत ज्यांचं अस्तित्व होतं अशा अति प्राचीन ७२ लांडग्यांचे अवशेष शास्त्रज्ञांना मिळून आले. त्यांच्या डीएनएच्या तपशीलवार अभ्यासातून शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढला आहे, की आज ज्याला आपण कुत्रा म्हणतो तो प्राणी अस्तित्वातच नव्हता. होता तो लांडगा आणि आजचा कुत्रा हे त्याचंच बदललेलं ‘विकसित’ रूप आहे!

पूर्वी युरेशिया (युरोप आणि आशिया)मध्ये जे लांडगे आढळायचे, त्यांच्यात आणि आजच्या कुत्र्यांमध्ये बरंचसं साम्य आहे. पश्चिम युरेशियात आढळणाऱ्या लांडग्यांचं आजच्या कुत्र्यांशी असलेलं साधर्म्य मात्र तुलनेनं बरंच कमी आहे. शास्त्रज्ञांना हेही आढळून आलं आहे, की लांडग्यांना पाळायची सुरुवात पहिल्यांदा युरेशियाच्या लोकांनी केली, त्यानंतर हा ‘ट्रेंड’ जगभर पसरला. विशेष म्हणजे कुठल्या एखाद-दुसऱ्या संशोधकानं हा अभ्यास केलेला नाही. या संशोधनात तब्बल १६ देशांतील ३८ संस्थांचे संशोधक सहभागी झाले होते. त्यांनी ३२ हजार वर्षांपूर्वीच्या सायबेरियन लांडग्यांच्या कवटीचा अभ्यास केला. या संशोधनात ९ डीएनए लॅबचाही सहभाग होता. या साऱ्या डीएनएंचा कालक्रमानुसार अभ्यास केला असता, जुन्या आणि नवीन कुत्र्यांचा डीएनए युरोपच्या लांडग्यांच्या तुलनेत आशियातील प्राचीन लांडग्यांशी जुळतो, हेही निदर्शनास आलं आहे.

संशोधकांना कुत्र्यांमध्ये प्राचीन लांडग्यांच्या दोन भिन्न प्रजातींचे डीएनए सापडले आहेत. ईशान्य युरोप, सायबेरिया आणि अमेरिकेतील जुन्या कुत्र्यांचे मूळ समान आहे; परंतु मध्य पूर्व, आफ्रिका आणि दक्षिण युरोपमधील कुत्र्यांचे दोन मूळ आहेत. त्यामुळेच खरंतर तुम्ही कुत्रा नव्हे, लांडगा पाळताहात असं संशोधकांचं म्हणणं आहे. ब्रिटनमधील फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी अलीकडेच तसा दावा केला आहे.

लांडग्यांच्या ३०,००० पिढ्यांचा अभ्यास
जगातलं अशा प्रकारचं हे पहिलंच आणि अतिशय व्यापक असं संशोधन आहे. पूर्वीचे लांडगे म्हणजेच आजचे कुत्रे हा निष्कर्ष काढण्यासाठी संशोधकांनी किती मागे जावं? त्यांनी लांडग्यांच्या तब्बल ३० हजार पिढ्यांच्या जनुकांचं परीक्षण केलं. त्यातून लांडग्यांचा डीएनए कसा बदलतो, कसा बदलत गेला, हे त्यांना कळलं. संशोधकांचं म्हणणं आहे की १०,००० वर्षांनंतर जनुकाचा हा दुर्मीळ प्रकार नंतर सामान्य झाला. आज हेच जनुक सर्व कुत्र्यांमध्ये आढळतं.

Web Title: How many years have you been keeping wolves ?; Scientists report new revelation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.