व्हेल मासेही गातात गाणी, १०० पेक्षा जास्त गाणी रेकॉर्ड!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 01:19 PM2018-11-15T13:19:24+5:302018-11-15T13:22:29+5:30
व्हेल माशांचा आकार हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. मात्र तुम्ही कधी गाणाऱ्या व्हेल माशांबाबत कधी ऐकलं नसेल.
व्हेल माशांचा आकार हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. मात्र तुम्ही कधी गाणाऱ्या व्हेल माशांबाबत कधी ऐकलं नसेल. पण आता उत्तर ध्रुवाच्या समुद्रात राहणाऱ्या व्हेल माशांबाबत आणखी एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. उत्तर ध्रुवातील सुमद्रात राहणारे व्हेल मासे हे गाणी गातात, असा दावा काही संशोधकांनी केला आहे. या व्हेल माशांच्या गाण्याचे १०० पेक्षा जास्त रेकॉर्डिंग करण्यात आले आहे.
संशोधकांनुसार, उत्तर ध्रुवातील ग्रीनलॅंडच्या आजूबाजूच्या परिसरातील समुद्रात धनुष्याकार आकाराचं डोकं असलेले व्हेल मासे हे इतर माशांच्या तुलनेत २०० वर्ष जास्त जिवंत राहतात. हे मासे सर्वच समुद्री जीवांपेक्षा जास्त सामाजिक असतात, त्यामुळेच ते एकमेकात खूप जास्त संवाद साधतात.
संशोधकांनी २०१० ते २०१४ पर्यंत समुद्रात मायक्रोफोन लावून या माशांचे आवाज रेकॉर्ड केलेत. हे रेकॉर्डिंग तपासताना त्यांच्या असे लक्षात आले की, हे मासे केवळ आपसात बोलतच नाही तर वेगवेगळ्या प्रकारची गाणीही गातात. सुरुवातीला संशोधकांनी असा विचार केला की, मासे आपसात बोलत असतील. पण जसाजसा माशांच्या आवाजाचा संग्रह वाढत गेला तसतसं त्यांच्या लक्षात आलं हे माशांचं बोलणं नाही तर त्यांची गायकी आहे. या माशांचे त्यांनी १८४ गाणी रेकॉर्ड केली आहेत.
जर्नल बायोलॉजीमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, समुद्रात जास्तीत जास्त नर व्हेल गाणी गातात. कधी आपल्या नर मित्रांना बोलवण्यासाठी किंवा मादा व्हेल्सना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ते हे आवाज काढतात. संशोधकांनी असाही दावा केला आहे की, यातील काही मासे हे शास्त्रीय गाणी गातात तर काही जॅज प्रकारातील.
वॉशिंग्टन यूनिव्हर्सिटीचे केट स्टॅफोर्ड याबाबत सांगतात की, १२ ते १६ मीटर आकाराचे हंपबॅक व्हेल मासे समुद्रात शास्त्रीय गाणी गातात. तेच त्यांच्यापेक्षा अधिक आकाराचे बोहेड व्हेल मासे हे जॅज संगीत गातात. पण बोहेड व्हेल यांच्या गायनाचा काही नियम नाहीये. त्यामुळे त्यांच्याकडून गायली जाणारी गाणी ही वेस्टर्न जॅज संगीताप्रमाणे असतात.