रात्रीची जागरणं कराल, तर आयुष्य कमी होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 09:12 AM2023-06-24T09:12:36+5:302023-06-24T09:13:08+5:30

शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, आजच्या युगात रात्रपाळी, रात्री उशिरापर्यंतची कामं ही अनेकांसाठी त्यांच्या कामाचा भाग आहे; पण या लोकांचा अपवाद वगळता ज्यांना शक्य आहे, निदान त्यांनी तरी रात्रीची जागरणं अवश्य टाळावीत.

If you wake up at night, life will be shortened! | रात्रीची जागरणं कराल, तर आयुष्य कमी होईल!

रात्रीची जागरणं कराल, तर आयुष्य कमी होईल!

googlenewsNext

घुबड हा पक्षी आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. या पक्ष्याला अपशकुनी मानलं जातं. त्यामुळं या पक्ष्याला मारण्याचं प्रमाणही जगात खूप मोठं आहे; पण त्याहीपेक्षा या पक्ष्याचं वैशिष्ट्य म्हणजे या पक्ष्याचे वैशिष्ट्यपूर्ण डोळे. इतरांच्या तुलनेत त्याचे डोळे मोठे तर असतातच; पण रात्रीच्या मिट्ट अंधरातही अतिशय स्पष्टपणे पाहू शकण्याची त्याची क्षमता अतिशय अलौकिक आहे. इतर कोणत्याही पक्ष्यापेक्षा रात्रीच्या वेळी पाहण्याची या पक्ष्याची क्षमता खूपच जास्त आहे. त्यामुळेच रात्री सगळे प्राणी, पक्षी झोपेच्या अधीन होत असताना हा पक्षी मात्र त्याचवेळी शिकारीसाठी बाहेर पडतो. रात्रीच्या अंधारात लहान प्राण्यांची शिकार  करतो. विशेषत: उंदीर हे त्याचं आवडतं खाद्य.

दिवसाच्या प्रकाशात त्याला फारसं दिसत नाही. त्यामुळेच हा पक्षी निशाचर आहे. तो रात्री जागतो आणि दिवसा झोपा काढतो.
घुबडाच्या वैशिष्ट्याप्रमाणे जी माणसं रात्री जास्त वेळ जागतात, उशिरा झाेपतात, त्यांना ‘नाइट आउल्स’ म्हणजे निशाचर म्हटलं जातं. रात्री जागणं घुबडांना फायदेशीर आणि त्यांच्या आरोग्यासाठी कदाचित चांगलं असेलही; पण माणसांसाठी मात्र ही गोष्ट अनारोग्यकारकच आहे. त्याची काही ढोबळ कारणंही आपण सांगू शकतो; पण संशोधकांनी यावर नुकताच एक व्यापक अभ्यास केला आहे आणि यावर अधिक प्रकाश टाकला आहे. 

शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, आजच्या युगात रात्रपाळी, रात्री उशिरापर्यंतची कामं ही अनेकांसाठी त्यांच्या कामाचा भाग आहे; पण या लोकांचा अपवाद वगळता ज्यांना शक्य आहे, निदान त्यांनी तरी रात्रीची जागरणं अवश्य टाळावीत. निद्रानाश, हृदयविकार, चयापचयाचे आजार, लठ्ठपणा, डोळ्यांच्या दृष्टीत बिघाड, आपल्या शारीरिक, मानसिक क्षमता कमी होणं, निरुत्साही वाटणं, दिवसभर थकवा जाणवणं... यासारख्या अनेक तक्रारींची वाढ जागरणांमुळे होते, हे अनेकांनी प्रत्यक्ष अनुभवलं आहे; पण ही तर केवळ झलक आहे.
संशोधकांना अभ्यासात दिसून आलं आहे, ज्या व्यक्ती रात्रीची जास्त, अनावश्यक जागरणं करतात, त्यांना व्यसनांचीही लत खूप लवकर लागू शकते. अशा व्यक्ती व्यसनांच्या अधीन होऊ शकतात आणि त्यांच्या आयुष्याचे तीन-तेरा वाजू शकतात. 

रात्री जे जास्त जागरणं करतात, त्यांना असंही तंबाखूचं व्यसन, दारूचं व्यसन अधिक प्रमाणात असल्याचं  आढळून येतं. रात्री जागरणं करण्यासाठी त्यांना कुठल्या ना कुठल्या नशेचीही ‘गरज’ पडते. कारण त्याशिवाय  जास्त वेळ जागू शकत नाही, ‘किक’ बसत नाही आणि त्याशिवाय आम्ही काम करू शकत नाही, असं त्यांचंही म्हणणं असतंच. कोणत्याही एका नशेचं व्यसन लागलं की इतरही नशा करून पाहण्याची ओढ त्यांना लागते आणि मग ते पक्के ‘नशाबाज’ होऊ शकतात, असं संशोधकांचं म्हणणं आहे. त्या जोडीला सर्वांत मोठा धोका म्हणजे या लोकांचं आयुष्यही इतरांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कमी होतं. त्यांचं एकूण आयुष्य आणि ते जगत असलेल्या आयुष्याचा दर्जा तर खालावतोच; पण अशा लोकांना अकाली मृत्यू येण्याची शक्यताही इतरांपेक्षा तब्बल नऊ टक्क्यांनी वाढते. 

ज्या व्यक्ती रात्री उशिरा झोपतात, त्यांच्या शरीरात मेलाटोनिन हार्मोन्स खूप उशिरा स्रवतात. प्रत्येक व्यक्तीचं एक ‘बॉडी क्लॉक’ असतं. ते व्यवस्थित चालण्यासाठी या हार्मोन्सची आपल्या शरीरातील पातळी योग्य असणं अतिशय गरजेचं आहे. त्यावरच आपल्या झोपेचं चक्रही अवलंबून असतं. गेल्या वर्षी आणखी एक अभ्यास प्रसिद्ध झाला होता. त्यानुसार रात्री जागरणं करणाऱ्यांची शारीरिक क्षमता, फिटनेस लेव्हल झपाट्यानं कमी होते. समजा त्यांची क्रियाशीलता किंवा कामाचं प्रमाण जास्त असलं तरी त्यांच्यातील चरबी घटण्याचं प्रमाण मंदावतं आणि मग सगळंच बिघडत जातं. 

यासंदर्भात नुकताच झालेल्या एका रंजक अभ्यासात १९८१ ते २०१८ या काळात तब्बल २४ हजार जुळ्या भावंडांचा अभ्यास करण्यात आला. त्यांची वर्तणूक, आजार आणि झोपेची सायकल यासंदर्भात हा अभ्यास करण्यात आला. जुळ्यांचा अभ्यास यासाठी करण्यात आला, की त्यांच्यात इतर परिस्थिती जवळपास सारखी होती. त्यात या जुळ्यांपैकी जी भावंडं रात्री जास्त जागत होती, ती आपल्याच जुळ्या भावंडांपेक्षा कमी कार्यक्षम होती आणि त्यांच्यातलं आजारांचं प्रमाणही जास्त होतं..

मृत्यूचाही केला ३७ वर्षे अभ्यास!
१९८१ ते २०१८ या काळात (३७ वर्षे) मृत्यू झालेल्या सुमारे नऊ हजार लोकांचाही अभ्यास करण्यात आला. त्यांचं शिक्षण, झोपण्याच्या वेळा, व्यसनं इत्यादी गोष्टींचं विश्लेषण करण्यात आलं. निष्कर्ष अगदी स्पष्ट होता, ज्यांना रात्री जागरणं करण्याची सवय होती, त्यांचा मृत्यूही लवकर झाला होता!

Web Title: If you wake up at night, life will be shortened!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.