'बाप'माणूस! लेकीला सांभाळण्यासाठी वडिलांनी सोडली 'व्हाइस प्रेसिडेंट'ची नोकरी, लाखो रुपये होता पगार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 09:25 AM2022-11-20T09:25:36+5:302022-11-20T09:27:03+5:30
अनेकदा लोक मोठ्या पगाराच्या नोकऱ्या शोधत असतात. यासाठी त्यांना किती कष्ट करावे लागतात याचीही काही कल्पना नसते.
अनेकदा लोक मोठ्या पगाराच्या नोकऱ्या शोधत असतात. यासाठी त्यांना किती कष्ट करावे लागतात याचीही काही कल्पना नसते. मोठ्या पगाराच्या नोकरीची संधी हातून निसटू नये म्हणून मुलाखतीसाठी दिवसरात्र उमेदवार तयारी करतात. पण सध्या एका 'बाप'माणसाची गोष्ट चर्चेचा विषय ठरत आहे की ज्यानं आपल्या चिमुकल्या मुलीच्या संगोपनासाठी लाखो रुपये पगाराच्या नोकरीवर पाणी सोडलं आहे.
आपल्या लेकीसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतित करता येईल या उद्देशानं एका वडिलांनी नोकरीवर न जाता घरीच राहणं पसंत केलं आहे. लक्षवेधी गोष्ट म्हणजे मुलीसोबत वेळ व्यतित करण्याची संधी मिळणं हे म्हणजे आपल्या करिअरमधलं एक प्रमोशनच आहे असं त्यांचं म्हणणं आहे.
ही गोष्ट आहे IIT खरगपूरमधून शिक्षण घेतलेल्या अंकित जोशी यांची. एका यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात जे काही असायला हवे ते सर्व अंकित जोशी यांच्याकडे आहे. ते एका कंपनीच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी कार्यरत होते. "आपल्या मुलीच्या जन्माच्या काही दिवस अगोदरच मी भरगोस पगाराची नोकरी सोडली. पण मी बाप होणं हे प्रमोशनपेक्षा काही कमी नाही. नोकरी सोडण्याचा निर्णय घेताना मी जवळच्या लोकांना सांगितलं होतं की पुढे काही गोष्टी कठीण वाटतील. परंतु माझ्या पत्नीनं माझ्या निर्णयाचं समर्थन केलं", असं अंकित जोशी यांनी आपल्या निर्णयाबद्दल माहिती देताना सांगितलं.
अंकित ज्या कंपनीत उपाध्यक्ष म्हणून काम करत होते, तिथं त्यांना खूप प्रवास करावा लागायचा. "आपल्या मुलीच्या जन्मानंतर प्रवासात इतका वेळ घालवण्यासाठी मी तयार नव्हतो, म्हणून मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला", असं ते सांगतात. कंपनीनं त्यांना एक आठवड्याची पितृत्व रजा देखील दिली होती परंतु आपलं त्यावर समाधान झालं नाही. तसंच कंपनीकडून माझी आणखी काही अपेक्षा देखील नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. कारण त्यांनी काही महिन्यांपूर्वीच वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला होता.
नोकरी सोडल्यापासून जोशी यांनी आपल्या लेकीची काळजी घेण्यासाठी आपला संपूर्ण वेळ दिला आहे. पुढील नोकरीबाबत अंकित सांगतात की, जेव्हा योग्य वेगळ वाटेल तेव्हा नव्या नोकरीसाठी अर्ज करण्यास सुरुवात करेन, पण सध्या आपल्या लेकीसोबत वेळ व्यतित करणं जास्त महत्वाचं वाटत आहे.