एका बाईकवर विनाहेल्मेट सात जण; पण पोलिसांनी पावती न फाडताच सोडलं, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 10:18 AM2022-04-01T10:18:12+5:302022-04-01T10:18:24+5:30
फॅमिली कार पाहिली असेल, फॅमिली बाईक पाहिलीय का? पोलिसांनी डोक्यावर हात मारून घेतला
सीतामढी: अपघात टाळण्यासाठी राज्य सरकार आणि परिवहन विभागाकडून विविध कायदे करण्यात येतात. ते मोडले गेल्यास दंडही आकारला जातो. मात्र तरीही अनेकजण नियम पाळत नाही. हेल्मेट न वापरणाऱ्यांची संख्या तर लक्षणीय आहे. हेल्मेटमुळे जीव वाचल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र तरीही अनेक चालकांना शहाणपण सुचत नाही.
दुचाकीवर बसून जास्तीत जास्त दोघांनी प्रवास करावा, त्यांनी हेल्मेट घालावीत असा नियम आहे. नियम मोडल्यास पावती फाडली जाते. दंड आकारला जातो. मात्र तरीही अनेक जण नियम धाब्यावर बसवतात. बिहारच्या सीतामढीमध्ये असाच एक प्रकार घडला आहे. हा प्रकार पाहून वाहतूक पोलिसानं डोक्यावर हात मारून घेतला.
सीतामढीमध्ये एका दुचाकीवरून तीन, चार नव्हे तर तब्बल सात जण प्रवास करत होते. एक तरुण दुचाकी चालवत आहे. त्याच्यापुढे असलेल्या पेट्रोलच्या टाकीवर दोन चिमुरडे बसले आहेत. तरुणाच्या मागे दोन महिला बसल्या आहेत. दोघींच्या हातात प्रत्येकी एक मूल आहे. सातपैकी एकाही व्यक्तीनं हेल्मेट घातलेलं नाही.
एका बाईकवर सात जण पाहून पोलीस कर्मचाऱ्याला धक्काच बसला. त्यानं बाईक रोखून दुचाकीस्वाराला समजावलं. सात जण का जात आहात, याबद्दल विचारणा केली. मात्र त्याला कोणतंही समाधानकारक उत्तर देता आलं नाही. त्यानंतर त्यानं पोलिसांची माफी मागितली. पुन्हा अशी चूक होणार नाही, असा शब्द दिला. त्यानंतर पोलिसांनी त्याला जाऊ दिलं. पुन्हा अशी चूक करू नकोस अशी तंबी देऊन पोलिसांनी दुचाकीस्वाराला सोडलं.