‘येथे’ बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड भाड्याने मिळतील; शॉपिंग सेंटरमध्ये या, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 06:12 AM2022-02-19T06:12:10+5:302022-02-19T06:12:52+5:30
एकीकडे मुला-मुलींना लग्न करायचं नाही आणि दुसरीकडे पालकांचा लग्नासाठी धोशा, यातून सुटायचं कसं, यासाठी मुलींनी आता एक अतिशय अफलातून मार्ग शोधून काढला आहे. अनेक मुलींनी त्यासाठी चक्क बॉयफ्रेंडच भाड्यानं घ्यायला सुरुवात केली आहे.
चीनमध्ये लोकसंख्येचा प्रश्न त्यांच्या कायम अंगाशी येतो आहे. काहीही करा, तरी तो त्यांच्यावरच उलटतो. लोकसंख्या झपाट्यानं वाढत असल्यानं, काही वर्षांपूर्वी चीननं दाम्पत्यांना एकाच अपत्याची सक्ती केली होती. कालांतरानं या निर्णयाचे दुष्परिणाम दिसू लागल्यावर त्यांनी मुलं जन्माला घालण्याबाबतचं आपलं धोरण बरंच शिथिल केलं आणि लग्नांना, मुलं जन्माला घालायला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली, पण तरीही युवकांनी सरकारच्या धोरणाकडे पाठ फिरवली ती फिरवलीच.
अर्थात याला दुसरीही किनार आहे. आजकाल चीनमधील तरुण-तरुणी लग्नाला आणि मुलं जन्माला घालायला नकार देत असले, त्यासाठी जितका विलंब करता येईल, तितका विलंब ते करीत असले, तरी प्रत्येक आई-बापाला जे वाटतं, तेच चीनमधील पालकांनाही वाटतं. आपल्या मुला-मुलींचे लवकर दोनाचे चार हात व्हावेत, आपल्या जिवंतपणी नातवंडांचं तोंड पाहावं, ही आसही त्यामागे आहेच. मुला-मुलींचा लग्नाला कितीही विरोध असला, तरी ‘लग्नाळू’ झाल्याबरोबर पालक आपल्या मुला-मुलींमागे लग्नाचा लकडा लावतात. विशेषत: मुलगी लग्नाची झाली, की लगेच तिला उजवावी, हा विचार चिनी पालकांमध्ये आणि परंपरा पाळणाऱ्या जुन्या लोकांमध्ये अजूनही प्रचलित आहे. शिवाय मुलगी जास्त मोठी झाली, तर तिलाही इतरांप्रमाणे ‘शिंगं’ फुटतील आणि तीही लग्नाला नकार देईल, ही भीतीही पालकांना आहेच.
एकीकडे मुला-मुलींना लग्न करायचं नाही आणि दुसरीकडे पालकांचा लग्नासाठी धोशा, यातून सुटायचं कसं, यासाठी मुलींनी आता एक अतिशय अफलातून मार्ग शोधून काढला आहे. अनेक मुलींनी त्यासाठी चक्क बॉयफ्रेंडच भाड्यानं घ्यायला सुरुवात केली आहे. ही चित्रपटाची कथा वाटत असली, तरी वस्तुस्थिती आहे. आपल्या पालकांचा ससेमिरा टाळण्यासाठीची ही युक्ती आता नव्या बाजारपेठेला जन्म देत आहे. त्यामुळे अनेक संस्थांनी आता भाड्यानं बॉयफ्रेंड पुरवायला सुरुवात केली आहे. या सेवेला चांगली मागणीही आहे. हाच भाड्याचा बॉयफ्रेंड, मुली आपल्या आई-वडिलांपुढेही घेऊन जातात. पालकांच्याही आशा त्यामुळे पल्लवित होत आहेत. हाच बॉयफ्रेंड पुढे जाऊन कदाचित आपला जावई होईल, या कल्पनेनं ते खूश होतात, पण गरीब बिचाऱ्या अनेक पालकांना यातली खरी गोम माहीतच नाही.
भाड्यानं मिळणाऱ्या या बॉयफ्रेंडचं वैशिष्ट्यं म्हणजे ही सेवा अतिशय स्वस्तात उपलब्ध आहे. अर्थात यासाठीची मुख्य अट म्हणजे या बॉयफ्रेंड्सनी मुलींच्या अंगाला स्पर्शही करायचा नाही. अगदी तासावर आणि दिवसावरही हे बॉयफ्रेंड भाड्यानं मिळतात. त्यांची बेसिक फी किरकोळ आहे, पण या बॉयफ्रेंडला घेऊन घरी मिरवायचं असलं, त्यानं आपला हात धरलेला पालकांना दाखवायचं असलं,
त्याच्याबरोबर बागेत, सिनेमाला जायचं असलं, शॉपिंग करायचं असलं... तर प्रत्येक गोष्टीसाठीचा दर वेगळा... चीनमध्ये आजही मुलींच्या तुलनेत मुलांची संख्या जास्त असली, त्यामुळे लग्नासाठी मुलींना सहजपणे मुलं मिळत असतील, असं वाटत असलं, तरी अनेक मुलांचाही लग्नाला विरोधच आहे. कारण लग्न करणं, मुलं जन्माला घालणं यामागचं अर्थकारण आपल्याला परवडणार नाही, हे त्यांना माहीत आहे.
लग्नाच्या झंझटीपासून सुटका करणारी ही युक्ती सध्या मुलं-मुली दोन्हीही एन्जॉय करीत आहेत. चीनमधील ताओबाओ ही वेबसाईट सध्या तात्पुरता बॉयफ्रेंड भाड्यानं मिळविण्यासाठीचं मोठं मार्केट आहे. याशिवाय इतरही काही वेबसाइट्स, संस्था हा ‘उद्योग’ करतात, पण सर्वांत जास्त मागणी ताओबाओ या वेबसाइटकडे आहे. भाड्यानं बॉयफ्रेंड मिळवण्याचा हा प्रकार चीनमध्ये तसा बराच जुना असला, तरी आता त्याचं फॅड मोठ्या प्रमाणात वाढतं आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे फक्त ‘बॉयफ्रेंड’च भाड्यानं मिळतात, असा तुमचा समज असेल, तर तो सपशेल चुकीचा आहे. कारण मुलींवर जसं घरच्यांकडून लग्नाचं प्रेशर आहे, तसंच ते मुलांवरही आहे. त्यामुळे त्यांच्यासाठीही भाड्यानं ‘गर्लफ्रेंड’ मिळण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. लग्नाचा मुद्दा बाजूला ठेवला, पण कोणा तरुणाला एकही मुलगी ‘भाव’ देत नसेल, त्यामुळे त्याला ‘नैराश्य’ येऊ पाहात असेल, तर अशा तरुणांसाठीही भाड्याच्या गर्लफ्रेंड्स उपलब्ध आहेत. मात्र यासाठीही तीच प्रमुख अट आहे. गर्लफ्रेंड भाड्यानं मिळेल, पण तिला स्पर्शही करायचा नाही. ‘बॉयफ्रेंड’च्या तुलनेत ‘गर्लफ्रेंड’ मात्र खिशाला थोडी जड पडू शकते!..
शॉपिंग सेंटरमध्ये या, गर्लफ्रेंड घेऊन जा!
दक्षिण चीनमधील हुआन या शहरात तर एका शॉपिंग सेंटरनंच गर्लफ्रेंड भाड्यानं द्यायला सुरुवात केली आहे. या शॉपिंग सेंटरच्या प्रवेशद्वारावरच या सेवेसाठी इच्छुक मुली भेटतील. या सेवेचा उपयोग करून गर्लफ्रेंडला शॉपिंग, लंच किंवा डिनरला घेऊन जायचं! या शॉपिंग सेंटरच्या मालकाचं तर म्हणणं आहे, येत्या काळात शॉपिंगचा हा सगळ्यात मोठा ट्रेंड असेल आणि युवा वर्गाच्या त्यावर उड्या पडतील!