बिअर बारमध्ये चोरी, चोरट्यानं दारू पिऊन मालकाला लिहिली चिठ्ठी; वाचणारे झाले भावूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 13:28 IST2025-04-13T13:28:07+5:302025-04-13T13:28:57+5:30
सध्या या चोरट्याच्या दारू पिऊन लिहिलेल्या विचारमुद्रा पत्राची परिसरात एकच चर्चा सुरू आहे.

बिअर बारमध्ये चोरी, चोरट्यानं दारू पिऊन मालकाला लिहिली चिठ्ठी; वाचणारे झाले भावूक
नंदूरबार - तळोदा शहरातील चिनोदा चौफुलीवरील बिअर बारमध्ये शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्याने प्रवेश करून मद्य पिऊन जाताना मालकाला चिठ्ठी लिहिली. चोरट्याने लिहिलेले पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून हा प्रकार चांगला चर्चेचा विषय ठरत आहे.
तळोदा शहरातून जाणाऱ्या अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चिनोदा चौफुली नजीक असणाऱ्या एका बिअर बारमध्ये शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. मद्य प्राशन करून त्याने पोलिसांसाठी एक भावनिक आणि तत्वज्ञानाने भरलेले पत्र लिहिलं व आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला.
पत्रात त्याने स्पष्ट केलं की, त्यांची कुणाशीही दुश्मनी नाही, पण परिस्थितीने त्याला चोर बनवले. माझी हालतच बेबस आहे असं लिहून त्याने समाजाला आणि पोलीस यंत्रणेला थेट आत्मपरीक्षणाला लावणारे प्रश्न उपस्थित केले आहे. पोलीस खरंच इमानदार असतात का? आणि खराखुरा चोर कोण? जो चोरतो की जो चोर बनवतो? या पत्रात त्याने स्वत:चं जीवन चित्रपटासारखं असल्याचं नमूद केले असून पैशांवर माणूस प्रेम करतो अशी उपरोधिक टीकाही केली. एवढंच नव्हे तर १९९९-२००१ या काळात शहादा येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा पत्ताही विचारला.
सध्या या चोरट्याच्या दारू पिऊन लिहिलेल्या विचारमुद्रा पत्राची परिसरात एकच चर्चा सुरू आहे. काहींच्या मते मात्र त्यांच्या मागे एखादा वेगळाच ड्रामा असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. पोलीस आता या भावनिक चोरट्याच्या शोधात असून त्यांचं पत्र मात्र लोकांच्या मनात अनेक प्रश्न पेरून गेले आहे. रात्री लिहिलेले पत्र सकाळी सापडले आणि ते लागोलग सोशल मीडियावर व्हायरल झाले.