भारताचा ‘कोहिनूर’ राणीची सून कॅमिलाकडे; वाचा या हिऱ्याची रंजक कहानी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 08:26 AM2022-02-12T08:26:24+5:302022-02-12T08:26:57+5:30

या हिऱ्याचा इतिहास मोठा रोमांचक आहे. ‘कोहिनूर’चा अर्थ आहे ‘आभा’ किंवा प्रकाशाचा पर्वत! १०५ कॅरेटचा (२१.६ ग्रॅम) हा हिरा अतिशय मौल्यवान आहे

Indian Kohinoor' diamond To Camilla, daughter-in-law of 'queen; Read the interesting story | भारताचा ‘कोहिनूर’ राणीची सून कॅमिलाकडे; वाचा या हिऱ्याची रंजक कहानी 

भारताचा ‘कोहिनूर’ राणीची सून कॅमिलाकडे; वाचा या हिऱ्याची रंजक कहानी 

Next

भारतातील जगप्रसिद्ध असा कोहिनूर हिरा गेल्या अनेक वर्षांपासून ब्रिटनकडे आहे. हा हिरा परत भारतात आणावा, अशी भारतीयांची वर्षानुवर्षांची मागणी आहे. हा हिरा आम्ही परत भारतात आणूच, अशी ग्वाहीही अनेक राजकारण्यांनी आतापर्यंत दिली आहे. मात्र, अजूनही ते कोणालाच शक्य झालं नाही. आता तर ही मागणीही जवळपास बंद झाली आहे. पण भारताचा हाच कोहिनूर हिरा सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण ब्रिटनची राणी एलिझाबेथ हिच्या मुकुटात सध्या हा कोहिनूर हिरा जडवलेला आहे. हाच मुकुट येत्या काही काळात प्रिन्स चार्लस्ची दुसरी पत्नी कॅमिलाच्या शिरावर स्थानापन्न होणार आहे.

या हिऱ्याचा इतिहास मोठा रोमांचक आहे. ‘कोहिनूर’चा अर्थ आहे ‘आभा’ किंवा प्रकाशाचा पर्वत! १०५ कॅरेटचा (२१.६ ग्रॅम) हा हिरा अतिशय मौल्यवान आहे. एकेकाळी हा जगातला सर्वात मोठा ज्ञात हिरा समजला जात होता. हा हिरा भारतातील अनेक मुघल व फारसी राज्यकर्त्यांकडून शेवटी ब्रिटिशांकडे गेला आणि त्यांच्या शाही खजिन्यात सामील झाला. ब्रिटनचे तत्कालिन पंतप्रधान बेंजामिन डिजराएली यांनी महाराणी व्हिक्टोरिया यांना १८७७मध्ये भारताची सम्राज्ञी म्हणून घोषित केलं आणि त्यानंतर ‘काेहिनूर’ हिरा ब्रिटिश राजघराण्याचा हिस्सा झाला.

याच ‘कोहिनूर’बाबत अनेक आख्यायिकाही प्रसिद्ध आहेत. काहींच्या मते हा हिरा पुरुषांसाठी अपशकुनी आहे, तर महिलांसाठी सौभाग्याचं लेणं! इतर काहींच्या मते ज्याच्याकडे हा हिरा आला, तो नंतर ‘सम्राट’ झाला!  काही जणांच्या म्हणण्यानुसार ज्या पुरुषांकडे हा हिरा आला, ते बरबाद झाले. महाराजा रणजित सिंह यांच्याकडे हा हिरा आल्यावर त्यांचं राज्य नष्ट झालं, तर ज्या साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळत नव्हता, अशा ब्रिटिशांकडे हा हिरा आल्यावर त्यांच्या साम्राज्याला उतरती कळा लागली.

महाराणी एलिझाबेथ यांनी ब्रिटनची राजगादी आता प्रिन्स चार्लस् सांभाळतील, असं नुकतंच जाहीर केलं. प्रिन्स चार्लस् यांच्याकडे राजघराण्याची गादी आल्यानंतर म्हणजेच ते ‘राजा’ बनल्यावर त्यांची पत्नी कॅमिला यांच्या शिरावर काेहिनूर हिरा जडवलेला रत्नजडीत मुकुट चढवला जाईल.  हा मुकुट गेली सत्तर वर्षे राणी एलिझाबेथ यांच्याकडे आहे. चार्लस्चा राज्याभिषेक झाल्यानंतर माझ्याकडचा मुकुट ‘राणी कॅमिला’कडे जावा, अशी इच्छा राणी एलिझाबेथ यांनीही अलीकडेच व्यक्त केली होती. 

सन १९३७मध्ये किंग जॉर्ज सहावा यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी राणीसाठी प्लॅटिनमचा मुकुट तयार करण्यात आला होता. या मुकुटात एकूण २,८०० हिरे आहेत. त्यातच कोहिनूर हा सर्वात मोठा हिरा जडवलेला आहे. सध्या टॉवर ऑफ लंडन येथे तो प्रदर्शनात लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आला आहे. आता हा मुकुट कॅमिला यांच्याकडे जाणार असला तरी त्याची खरी हकदार प्रिन्स चार्लस्ची पहिली पत्नी प्रिन्सेस डायना होती. पण डायनाच्या मृत्यूनंतर प्रिन्स चार्लस् यांनी कॅमिला यांच्याबरोबर विवाह केला. डायना जिवंत असताना प्रिन्स चार्लस् आणि डायना यांच्यात बेबनाव निर्माण होण्यात कॅमिलाच कारणीभूत होत्या, असा आरोप आजही केला जातो.

भविष्यकाळात प्रिन्स चार्लस् यांना राजा बनविण्याचा निर्णय काही काळापूर्वी राजघराण्यानं घेतला होता. परंतु तरीही कॅमिला ‘प्रिन्सेस’च राहणार होती. मात्र, पाच वर्षांपूर्वी प्रिन्स चार्लस् यांनी, ‘माझ्या राज्याभिषेकाच्या शपथग्रहणप्रसंगी कॅमिलाला ‘प्रिन्सेस’ऐवजी ‘क्वीन’ (राणी) म्हणण्याची परवानगी महाराणी एलिझाबेथ यांच्याकडे मागितली होती. त्यांनीही चार्लस् यांच्या या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. काेहिनूरचा ताज कॅमिलाकडे जाणार हे त्याच वेळी निश्चित झालं होतं. ज्या क्षणी कोहिनूर हिरा ब्रिटिश राजघराण्याच्या खजिन्याचं वैभव बनला, त्यानंतर राजघराण्यातील अनेक राण्यांना कोहिनूरचा ताज आपल्या शिरावर मिरवण्याचा बहुमान मिळाला. पहिल्यांदा राणी व्हिक्टोरिया, त्यानंतर राणी अलेक्झांड्रा, नंतर राणी मेरी आणि सध्या महाराणी एलिझाबेथ यांच्या शिरावर हा मुकुट सजतो आहे. तो बहुमान आता कॅमिलाला मिळेल.

प्रिन्स चार्लस् आणि कॅमिला यांचा २००५मध्ये विवाह झाला, त्यावेळी ब्रिटिश राजघराण्यानं स्पष्ट केलं होतं, भविष्यात प्रिन्स चार्लस् राजा बनला तरी कॅमिला मात्र ‘प्रिन्सेस’च राहील. पण महाराणी एलिझाबेथ यांच्या हस्तक्षेपामुळे कॅमिलाचा ‘राणी’ बनण्याच्या मार्गातला अडथळाही आता दूर झाला आहे.

‘कोहिनूर’चे अनेक दावेदार !
कोहिनूर हिरा जगप्रसिद्ध आहे. मात्र, त्याच्या बाबतीतलं गूढ अजूनही उकललेलं नाही. भारत जसा या हिऱ्यावर आपला दावा सांगतो, तसंच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांचंही म्हणणं आहे, कोहिनूर इतर कोणाचा नसून तो फक्त आमचाच आहे. अर्थातच याचं कारण हा हिरा भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, ब्रिटन असे अनेक देश फिरुन आला आहे आणि अनेक राज्यकर्त्यांच्या खजिन्याचा तो ताज ठरलेला आहे. इतकी वर्षे झाली, पण त्याबाबतचा वाद अजूनही सुरूच आहे.

Web Title: Indian Kohinoor' diamond To Camilla, daughter-in-law of 'queen; Read the interesting story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.