केवळ 350 रुपये कमवणाऱ्या तरुणाची इंग्लंडमध्ये कोट्यवधींची कंपनी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 03:41 PM2018-07-28T15:41:54+5:302018-07-28T15:43:47+5:30
काहीतरी करण्याच्या नादात तो इंग्लंड गेला आणि आज कोट्यवधींच्या कंपनीचा मालक झाला. ज्यावेळी तो इंग्लंडला गेला त्यावेळी तो मॅक्डोनल्डमध्ये काम करायचा. त्यासाठी त्याला दिवसाला 350 रुपये मिळायचे.
इंग्लंड : आपणा सर्वांनाच माहीत आहे की, मोठं होण्याची केवळ स्वप्ने पाहून चालत नाही. त्यासाठी खूप मेहनत करणेही तितकेच गरजेचे आहे. मेहनतीचं फळ काय असतं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे लंडनमध्ये मोठा बिझनेस उभारणारा हा भारतीय तरुण. केवळ काही रुपये घेऊन लंडनमध्ये गेलेल्या तरुणाची आज तिथे 18 कोटी रुपयांची कंपनी आहे. चला जाणून घेऊ त्याच्या प्रवासाची कहाणी...
काहीतरी करण्याच्या नादात तो इंग्लंड गेला आणि आज कोट्यवधींच्या कंपनीचा मालक झाला. ज्यावेळी तो इंग्लंडला गेला त्यावेळी तो मॅक्डोनल्डमध्ये काम करायचा. त्यासाठी त्याला दिवसाला 350 रुपये मिळायचे. आज त्याचे प्रॉडक्ट्स इंग्लंडच्या प्रसिद्ध हार्वे निकोलस स्टोरमध्ये विकले जातात.
या भारतीय तरुणाचं नाव आहे रुपेश थॉमस. केरळमध्ये जन्मलेला हाच रुपेश आज इंग्लंडच्या विम्बल्डनमध्ये 9 कोटींच्या बंगल्यात राहतो. तर त्याने त्यांचा दुसरा बंगला साऊथ इंग्लंडच्या क्रेडॉनमध्ये 3 कोटी रुपयांना खरेदी केलाय. त्याचा टुक टुक चहाच्या बिझनेसची किंमत आज 18 कोटी रुपयांची आहे. त्याच्या चहाची विक्री आता लक्झरी डिपार्टमेंयल स्टोर हार्वे निकोलसमधून होते.
केरळमध्ये जन्मलेल्या रुपेशचा इंग्लंडसोबत एक वेगळाच संबंध होता. त्याने सांगितले की, त्याचे वडील कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करायचे. त्यांच्याकडे इंग्लंडचा एक फोटो होता. तो मी नेहमी बघायचो. त्या ठिकाणी जाण्याचं स्वप्न मी नेहमी पाहत होतो.
असा पोहोचला इंग्लंडला
23 वर्षांचा असताना रुपेशने 28 हजार रुपयात आपली बाईक विकली होती. वडिलांकडून काही रक्कम घेतली आणि तो 2002 मध्ये इंग्लंडला गेला. त्यावेळी तो इस्ट इंग्लंडच्या स्ट्रेटफोर्डमध्ये पोहोचला. इथे त्याने मॅक्डोनल्डमध्ये काम केलं. इथे त्याला 350 रुपये मिळायचे.
त्याने सांगितले की, हे काम फार मेहनतीचं होतं. पण मी नेहमी हसत हसत काम केलं. अनेक बिझनेसमनला पाहून मला जाणवत होतं की, मला काय करायचंय. या कामानंतर काही दिवसातच मला सेल्समनचं काम मिळालं. त्याचं चांगलं काम पाहून त्याला कंपनीने वेस्ट सेलर केलं आणि त्यानंतर तो टीम लिडर झाला. या कामावेळीच त्याची भेट पत्नी अलेक्झांड्रासोबत झाली.
अनेक भेटींनंतर दोघांनी 2007 मध्ये लग्न केलं. लग्नाचं सेलिब्रेशन फ्रान्स आणि भारतातील केरळ दोन्ही ठिकाणी झालं. 2009 मध्ये त्यांनी विम्बल्डन टेनिस ग्राऊंडजवळ एक मिड टेरेस घर घेतलं. त्यांना एक मुलगा असून तो 7 वर्षांचा आहे.
असा सुरु केला बिझनेस
रुपेशने सांगितले की, सेल्समन म्हणून काम करणं फार कठिण होतं. तासंतास काम करावं लागत होतं. पण मला पैशांची फार गरज होती. त्यामुळे काम करणही गरजेचं होतं. त्याच्या सेल्सच्या कौशल्यामुळे त्याला एका मोबाइल कंपनीमध्ये नोकरी मिळाली. रुपेशने सांगितले की, त्याला बिझनेसची आयडिया 2007 मध्ये आली. त्याने त्याची पत्नीची भारतीय चहाची आवड पाहिली होती.
अलेक्झांड्राला चहा फार आवडत होता. जेव्हाही दोघे भारतात असायचे तेव्हा ती साधारण दिवसभरात 10 कप चहा प्यायची. हे यूकेमध्येही सुरुच होतं. पणा चहामध्ये साखर जास्त होती. त्यासोबतच हा चहा चहाच्या पानांपासूनही तयार होत नव्हता. त्यामुळे त्याला याच्या प्रॉडक्शनची कल्पना सुचली.
सेव्हिंगच्या आधारे सुरु केला बिझनेस
2015 मध्ये त्याने त्याच्याकडे असलेल्या पैशांपैकी दीड लाख रुपये बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय घेतला. याचा त्याला फायदाही झाला. रुपेशने सांगितले की, त्याने हा एकप्रकारे जुगारच खेळला होता. त्याला वाटलं होतं की, चहासाठी इथे मोठं मार्केट आहे. आणि हा जुगार फायद्याचा ठरला.