Indian Railway Fare: ट्रेनने प्रवास करता? मग जाणून घ्या तिकीट भाडे कसे ठरवले जाते...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 04:14 PM2023-04-21T16:14:15+5:302023-04-21T16:14:43+5:30
Indian Railway Fare: आज भारतभर इंडियन रेल्वेचे जाळे पसरले आहे. यातून दररोज लाखो-करोडो लोक प्रवास करतात.
Indian Railway Fare: देशाला एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत जोडण्याचे काम भारतीय रेल्वेने केले आहे. भारतीय रेल्वेचे जाळे संपूर्ण देशात पसरलेले आहे. यामुळे दररोज लाखो-करोडो लोकांना स्वस्त दरात प्रवास करता येतो. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, रेल्वेचे भाडे कसे ठरवले जाते. चला तर मग जाणून घेऊया...
तुम्ही अनेकदा ट्रेनचे तिकीट बुक करण्यासाठी वेबसाईटचा वापर करता किंवा स्टेशनवर जाऊन तिकीत काढता. पण, याचे भाडे कसे ठरवले जाते? तर, तुमच्या ट्रेनच्या भाड्यात विविध शुल्क संलग्न आहेत. हे शुल्क तुमच्या ट्रेनच्या प्रकारावर अवलंबून असतात. शताब्दी गाड्यांसाठी वेगळे शुल्क आहे, तर राजधानी, एक्स्प्रेस आणि इतर गाड्यांसाठी वेगळे शुल्क आहे. आता यामध्ये अंतर शुल्क, आरक्षण शुल्क, जीएसटी आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्याआधारे तुमचे ट्रेनचे भाडे ठरवले जाते.
अशा प्रकारे तुमचे भाडे मोजले जाते
तुमच्या ट्रेनच्या भाड्यामध्ये किलोमीटर हा सर्वात मोठा घटक आहे. तुम्हाला किती किलोमीटर प्रवास करायचा आहे, हा सर्वात मोठा मुद्दा आहे. रेल्वे भाड्याचे अंतर अनेक श्रेणींमध्ये विभागले गेले आहे. जसे 1-5, 6-10, 11-15, 16-20, 21-25 आणि असेच 4951-5000 किमीचे वर्ग आहेत. तुम्ही प्रवास करत असलेल्या अंतरानुसार तुमचे भाडे ठरवले जाईल.
रेल्वेच्या भाड्याची संपूर्ण माहिती भारतीय रेल्वेच्या वेबसाइटवर आहे. तुम्ही संपूर्ण डिटेल किंवा तिकीट ब्रेकअप पाहू शकता. यासाठी भारतीय रेल्वेच्या वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला रेल्वे बोर्ड विभागात जावे लागेल आणि तेथे तुम्हाला कोचिंग विभागात भाड्याची माहिती मिळेल.
बस, टॅक्सीच्या तुलनेत ट्रेनचा प्रवास स्वस्त
ट्रेनच्या भाड्याची तुलना बस, टॅक्सी किंवा इतर सार्वजनिक वाहनांशी केली, तर ट्रेनने प्रवास करणे खूपच स्वस्त आहे. यामध्ये तुम्हाला टोल, पेट्रोल किंवा इतर पैसे खर्च करावे लागत नाहीत. समजा तुम्ही लखनऊहून दिल्लीला कॅबने येत असाल तर तुम्हाला किमान 8 हजार रुपये खर्च करावे लागतील. तर, फक्त 1000 किंवा 1200 रुपयांमध्ये 6 तासात ट्रेनने दिल्लीला पोहोचू शकता.