'हे' आहे देशातील सर्वात मोठे नाव असलेले रेल्वे स्थानक, स्पेलिंग वाचून तुमचे डोके चक्रावून जाईल!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 07:31 PM2022-12-17T19:31:02+5:302022-12-17T19:32:09+5:30
Indian Railways facts : भारतीय रेल्वेचे सर्वात व्यस्त रेल्वे स्थानक हावडा जंक्शन आहे, ज्यात जास्तीत जास्त प्लॅटफॉर्म आहेत.
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे (Indian Railways) जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. भारतीय रेल्वे जगातील 8 व्या क्रमांकाचे सर्वात मोठे नियोक्ता म्हणून देखील ओळखले जाते. देशातील पहिली पॅसेंजर ट्रेन 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावली, हे तुम्हाला माहीत आहे का? भारतीय रेल्वेशी संबंधित अशा अनेक रंजक गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला कदाचित माहिती नसतील. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत.
सर्वात मोठे नाव असलेले रेल्वे स्थानक
वेंकटनरसिंहराजूवरीपेटा (Venkatanarasimharajuvaripeta) हे इतके मोठे नाव आहे की वाचताना जीभही उत्तर देऊ शकते. भारतातील सर्व रेल्वे स्थानकांची नावे वेंकटनरसिंहराजूवरीपेटा रेल्वे स्थानकापेक्षा लहान आहेत. हे रेल्वे स्थानक नावाने प्रसिद्ध आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे यात 28 अक्षरे आहेत. यावरून रेल्वे स्थानकाचे नाव किती मोठे आहे, याचा अंदाज बांधता येतो. हे नाव उच्चारायला सोपे जावे, म्हणून लोक त्याला वेंकटनरसिंह राजुवरीपेट या नावानेही संबोधतात. वेंकटनरसिंहराजूवरीपेटा हे आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात तामिळनाडूच्या सीमेवर स्थित आहे.
सर्वात लहान नाव असलेले रेल्वे स्थानक
आता तुम्ही देशातील सर्वात मोठे नाव असलेल्या रेल्वे स्थानकाच्या माहितीबद्दल जाणून घेतले. पण आता तुम्ही देशातील सर्वात लहान नाव असलेल्या रेल्वे स्थानकाबद्दल जाणून घ्या... सर्वात लहान नाव असलेले रेल्वे स्थानक इब (IB) आहे. ओडिशातील झारसुगुडा येथे असलेले इब रेल्वे स्थानक फक्त दोन अक्षरांपुरते मर्यादित आहे. दरम्यान, इब हावडा-नागपूर-मुंबई रेल्वे मार्गावर आहे. या स्थानकावर फक्त 2 फलाट आहेत. यामुळेच या स्थानकावरून फारशा गाड्या जात नाहीत, गाड्यांचा थांबाही केवळ दोन मिनिटांचा आहे.
भारतीय रेल्वेशी संबंधित इतर माहिती...
- आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवरील बोगीबील पूल हा भारतातील सर्वात लांब रेल्वे-रोड पूल आहे.
- पीर पंजाल रेल बोगदा, जम्मू आणि काश्मीरच्या मध्यभागी हिमालयाच्या पीर पंजाल प्रदेशात स्थित आहे, हा भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा आहे.
- भारतीय रेल्वेकडे युनेस्को-मान्यताप्राप्त चार जागतिक वारसा स्थळे आहेत.
- 7 रेल्वे मार्ग मथुरा जंक्शनपासून उगम पावतात, जे जास्तीत जास्त रेल्वे मार्ग असलेले जंक्शन आहे.
- भारतीय रेल्वेचे सर्वात व्यस्त रेल्वे स्थानक हावडा जंक्शन आहे, ज्यात जास्तीत जास्त प्लॅटफॉर्म आहेत.
- गोरखपूरमध्ये जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म आहे, ज्याची लांबी 4,483 फूट आहे.
- हावडा-अमृतसर एक्स्प्रेसला सर्वाधिक थांबे (115 थांबे) आहेत.
- लॉर्ड डलहौसी यांना भारतीय रेल्वेचे जनक म्हटले जाते.
- जॉन मथाई हे भारताचे पहिले रेल्वे मंत्री होते.
- भारतीय रेल्वे रॉयल राजस्थान ऑन व्हील्स, पॅलेस ऑन व्हील्स, द गोल्डन रथ, महाराजा एक्सप्रेस आणि द डेक्कन ओडिसी या 5 रॉयल ट्रेन्स देखील चालवते.