Indian Railways : ट्रेनला उशीर झाला तर जेवण आणि 'या' गोष्टी मिळतील मोफत; नियम व अधिकार जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 03:36 PM2022-09-06T15:36:14+5:302022-09-06T15:37:04+5:30
Indian Railways : ट्रेनला उशिर झाल्यास आयआरसीटीसी तुम्हाला कोणत्या सेवा मोफत देते, त्याबद्दल जाणून घेऊया....
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक सेवा सुरू केल्या आहेत. आयआरसीटीसी (IRCTC) प्रवाशांना तिकीट बुकिंगपासून ते फूड डिलिव्हरी आणि इतर गोष्टींसाठी सुविधा प्रदान करते. दुसरीकडे, ट्रेनला उशीर झाल्यास तुम्हाला अनेक सुविधाही मोफत मिळतात. भविष्यात कधीतरी ट्रेनला उशीर झाला तर प्रवासी म्हणून तुम्हालाही काही अधिकार आहेत. अशाच एका अधिकाराबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत. ट्रेनला उशिर झाल्यास आयआरसीटीसी तुम्हाला कोणत्या सेवा मोफत देते, त्याबद्दल जाणून घेऊया....
जर तुमच्या ट्रेनला उशीर झाल्यास आयआरसीटीसी तुम्हाला जेवण आणि सॉफ्ट ड्रिंक पुरवते. हे जेवण तुम्हाला आयआरसीटीसीकडून अगदी मोफत दिले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा अधिकार वापरून मोफत जेवण आणि सॉफ्ट ड्रिंक मागवू शकता. भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, जेव्हा ट्रेन उशीरा येते तेव्हा प्रवाशांना आयआरसीटीसीच्या कॅटरिंग पॉलिसी अंतर्गत नाश्ता आणि हलके जेवण दिले जाते.
कोणत्या प्रवाशांसाठी मिळते ही सुविधा
आयआरसीटीसीच्या नियमांनुसार प्रवाशांना मोफत जेवण दिले जाते, मात्र ट्रेन 30 मिनिटे उशिराने आली तर जेवणाची सुविधा मिळेल असे नाही. केटरिंग पॉलिसीनुसार, ट्रेन दोन तास किंवा त्याहून अधिक उशिराने आल्यास मोफत जेवणची सुविधा दिली जाते. मात्र, ही सुविधा केवळ शताब्दी, राजधानी आणि दुरांतो ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांनाच दिली जाते.
ट्रेनला उशीर झाला तर मोफत काय मिळेल?
इंडियन एक्स्प्रेसमधील एका बातमीनुसार, चहा/कॉफी कॅटगरीमध्ये दोन बिस्किटे, चहा/कॉफी किट (7 ग्रॅम) चहा/कॉफी, मिल्क क्रीमर पाउच (5 ग्रॅम) दिले जातात. दुसरीकडे, नाश्ता आणि संध्याकाळच्या चहासाठी, 4-ब्रेड स्लाइस, 1-बटर चिपलेट (8-10 ग्रॅम), 1-टेट्रा पॅकमध्ये ज्यूस (200 मिली), चहा/ कॉफी किट आणि चहा/कॉफी, मिल्क क्रीमर पाउच (5 ग्रॅम) दिले जाते. दुसरीकडे, लंच/डिनरमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भात (200 ग्रॅम), डाळ (100 ग्रॅम) (पिवळी मसूर/चोले) आणि लोणचे पाउच (15 ग्रॅम) किंवा याऐवजी तुम्ही 7 पुरी (175 ग्रॅम) मिक्स व्हेज/आलू भजी (150 ग्रॅम), लोणचे पाउच (15 ग्रॅम), मीठ आणि मिरपूड पाउच ऑर्डर करू शकतात.