55 वर्षे शौचालयाशिवाय धावत राहिली भारतीय रेल्वे, 'या' एका तक्रारीनंतर सुरू झाली टॉयलेची व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 08:01 PM2022-12-14T20:01:41+5:302022-12-14T20:03:09+5:30
अतिशय रंजक आहे, भारतीय रेल्वेत शौचालय सुरू होण्यामागची स्टोरी...!
सध्या देशात बुलेट ट्रेनवर चर्चा सुरू आहे. यासंदर्भात माध्यमांत सातत्याने बातम्याही येत असतात. पण आपल्याला माहीत आहे का, की आज आपण ज्या स्वरुपात भारतीय रेल्वे पाहत आहोत, ती पूर्वी तशी नव्हती. भारतात रेल्वे सुरू झाल्यानंतर बरीच वर्षे तिच्यात शौचालयाची व्यवस्थाच नव्हती. अर्थात ती शौचालयाशिवाय धावत होती. मग भारतीय रेल्वेत शौचालयाची सुविधा कशी सुरू झाली? अतिशय रंजक आहे, भारतीय रेल्वेत शौचालय सुरू होण्यामागची स्टोरी...!
भारतात पहिली पॅसेंजर ट्रेन 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. मात्र, यावेळी रेल्वेमध्ये शौचालयाची सुविधा नव्हती. शौचालयाची सुविधा नसल्याने रेल्वेने प्रवास करताना नागरिकांना अनेक अडचणी यायच्या. भारतात रेल्वे सुरू झाल्यानंतर जवळपास 55 वर्षांनंतर, भारतीय रेल्वेमध्ये शौचालाची व्यवस्था सुरू करण्यात आली. याचे संपूर्ण श्रेय जाते, ओखिल चंद्र सेन नावाच्या एका बंगाली व्यक्तीला. त्यांच्याच एका तक्रारीनंतर रेल्वेमध्ये शौचालयाची सुविधा सुरू करण्यात आली.
अशी आहे रेल्वेत शौचालय सुरू होण्यामागची कहाणी -
भारतातील ट्रेनमध्ये 1909 साली टॉयलेटची सुविधी सुरू करण्यात आली. यापूर्वी, रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना केवळ स्थानकांवरच स्वच्छतागृहाची सुविधा मिळत होती. एकदा ओखिल चंद्र सेन नावाची एक व्यक्ती रेल्वेने प्रवास करत असताना, शौचालय वापरण्यासाठी स्टेशनवर उतरली आणि त्याच दरम्यान त्याची ट्रेन चुकली. यानंतर ओखिल चंद्र सेन यांनी पश्चिम बंगालच्या सबिहगंज विभागीय कार्यालयाला पत्र लिहून ट्रेनमध्ये शौचालयाची सुवीधी देण्यासंदर्भात विनंती केली. यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी ५० मैलांपेक्षा अधिक अंतर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये शौचालयाची सुविधा सुरू केली होती.
रेल्वे म्युझियममध्ये अजूनही आहे ते पत्र -
ओखिल चंद्र सेन यांचे ते पत्र आजही दिल्ली येथील रेल्वे म्युझियममध्ये जतन करून ठेवण्यात आलेले आहे. आपल्याला माहीतच असेल, की अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारतीय रेल्वे, हे जगातील चौथा क्रमांकांचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. तसेच, जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात आहे.