भारतातील असं ठिकाण जिथे लग्नात अग्निला नाही तर पाण्याला साक्षी मानून घेतली जाते सप्तपदी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 11:48 AM2023-01-23T11:48:19+5:302023-01-23T11:52:44+5:30
Indian Unique Wedding Ritual :जास्तीत जास्त ठिकाणी लग्नात नवरी-नवरदेव अग्निला साक्षी मानून सप्तपदी घेताना दिसतात. मात्र, भारतात एक ठिकाण असंही आहे जिथे लोक अग्निला नाही तर पाण्याला साक्षी मानून लग्नाचे सगळे रिवाज पूर्ण करतात.
Indian Unique Wedding Ritual : आपल्या देशात वेगवेगळ्या संस्कृती, प्रथा, कला, जात-धर्म, भाषा आहेत. म्हणूनच वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या परंपरा बघायला मिळतात. हेच लग्नांबाबतही आहे. देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात तुम्हाला वेगवेगळ्या प्रथा बघायला मिळतील. पण जास्तीत जास्त ठिकाणी लग्नात नवरी-नवरदेव अग्निला साक्षी मानून सप्तपदी घेताना दिसतात. मात्र, भारतात एक ठिकाण असंही आहे जिथे लोक अग्निला नाही तर पाण्याला साक्षी मानून लग्नाचे सगळे रिवाज पूर्ण करतात.
कुठे आहे ही अनोखी प्रथा?
ही परंपरा छत्तीसगढ़च्या बस्तरमधील आदिवासी समाजात पाळली जाते. येथील आदिवासी समाज नेहमीपासून निसर्गाची पूजा करतात. त्यांचं असं करण्यामागचं कारणही फारच इन्स्पायरिंग आहे. ते हे असं लग्नात होणारा विनाकारणाचा खर्च रोखण्यासाठी असं करतात. ही परंपरा फार आधीपासून पाळली जाते.
छत्तीसगढ़च्या धुरवा समाजात पाण्याला फार महत्व आहे. पाणी त्यांच्यासाठी देवासारखं आहे. त्यामुळे ते केवळ लग्नातच नाही तर सगळ्याच शुभ कार्यांमध्ये पाण्याला साक्षी मानून रिवाज पार पाडतात. धुरवा समाजातील लोक मूळचे बस्तरचे राहणारे आहेत. त्यांचे पूर्वज कांकेर घाटी राष्ट्रीय उद्यानाजवळ राहत होते. ते सुद्धा कांकेर नदीचं पाणी शुभ कार्यांसाठी वापरत होते.
पूर्ण गाव नवरी-नवरदेवासोबत घेतात सप्तपदी
बस्तरमध्ये राहणारे आदिवासी लोक जुन्या मान्यतांना खूप महत्व देतात. त्यामुळेच ते सगळ्या शुभ कार्यांमध्ये झाड आणि पाण्याची पूजा करतात. इथे लग्नात केवळ नवरी-नवरदेवच नाही तर गावातील सगळे लोक सप्तपदी घेतात. या लग्नांमध्ये नाले, तलावव, नदी, काही झाडातील आणि विहिरीच्या पाण्याचा वापर होते. या पाण्याला लोक देव मानतात.