Inspirational Story : ६०० ईमेल, ८० कॉल... अन् वर्ल्ड बँकेत नोकरी! तरुणाची संघर्षमय प्रवासाची पोस्ट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 07:48 AM2022-09-28T07:48:17+5:302022-09-28T07:49:09+5:30
मेहनत कधीही व्यर्थ जात नाही आणि यशाचा कोणता शॉर्टकट नसतो, असे म्हणतात. दिल्लीच्या एसआरसीसी कॉलेजचा पदवीधर वत्सल नाहटा याने हेच सिद्ध केले आहे.
मेहनत कधीही व्यर्थ जात नाही आणि यशाचा कोणता शॉर्टकट नसतो, असे म्हणतात. दिल्लीच्या एसआरसीसी कॉलेजचा पदवीधर वत्सल नाहटा याने हेच सिद्ध केले आहे. वाईट काळातही संयम राखून त्याने आपले प्रयत्न सुरूच ठेवले आणि अखेर त्याला जागतिक बँकेत नोकरी मिळाली. त्याने हा संपूर्ण प्रवास लिंक्डइनवरील दीर्घ पोस्टमध्ये कथन केला आहे.
हा संघर्ष कोविड-१९ च्या वेळी २०२० मध्ये सुरू झाला. त्यावेळी त्याचे अमेरिकेतील येल विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण होणार होते. तो नोकरीच्या शोधात होता. पण, मंदीमुळे अनेक कंपन्या कर्मचारी कमी करत होत्या. तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही कंपन्यांवर केवळ अमेरिकन कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्यासाठी दबाव आणला होता. नोकरी मिळत नसल्याने येलमध्ये येऊन काय उपयोग, असा प्रश्न वत्सलला पडला.
“फोन करून आई-वडील काय करतोय असे विचारायचे, तेव्हा त्यांना उत्तर देणे कठीण झाले होते. पण भारतात परतणे हा पर्याय नाही आणि माझा पहिला पगार फक्त डॉलर्समध्ये असेल असे मनाशी ठरवले. दोन महिन्यात लिंक्डइनवर १,५०० कनेक्शन रिक्वेस्ट पाठवल्या, ६०० ईमेल लिहिले आणि ८० कॉल केले. बहुतांश ठिकाणी नकार मिळाला, तरीही हार मानली नाही,” असे वत्सलने म्हटले. ‘अखेर मे महिन्यात ४ नोकरीच्या ऑफर मिळाल्या आणि मी जागतिक बँकेची निवड केली. ते माझ्या ‘ओपीटी’(ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग) नंतर माझा व्हिसा प्रायोजित करण्यास तयार झाले, आणि माझ्या व्यवस्थापकाने मला जागतिक बँकेच्या सध्याच्या संशोधन संचालकांसोबत मशीन लर्निंग पेपरवर सह-लेखनाची ऑफर दिली”.
प्रयत्न सुरूच ठेवा, हार मानू नका
ही नोकरी मिळाली तेव्हा तो २३ वर्षांचा होता. आता ३ वर्षांनी लोकांनी हार मानू नये हे सांगण्यासाठी त्याने आपला संघर्ष पोस्टद्वारे मांडला. “तुम्हीही अशाच परिस्थितीतून जात असाल आणि जग तुमच्या विरोधात आहे, असे वाटत असेल तरी, प्रयत्न सुरूच ठेवा... जर तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकत असाल आणि पुरेसे दरवाजे ठोठावले तर चांगले दिवस नक्कीच येतील,” असे त्याने अखेरीस लिहिले.
वत्सल नाहटा