एका स्त्री रूग्णामुळे डॉक्टरांची झाली होती पंचाईत, तेव्हाच लागला होता स्टेथस्कोपचा शोध....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 12:16 PM2019-12-03T12:16:24+5:302019-12-03T12:17:07+5:30
डॉक्टर असा विचार केला गेल्यावर साधारणपणे सर्वांच्या डोळ्यांसमोर अंगावर पांढरा कोट आणि गळ्यात स्टेथस्कोप घातलेली व्यक्ती लगेच येते.
डॉक्टर असा विचार केला गेल्यावर साधारणपणे सर्वांच्या डोळ्यांसमोर अंगावर पांढरा कोट आणि गळ्यात स्टेथस्कोप घातलेली व्यक्ती लगेच येते. म्हणजे हा स्टेथस्कोप डॉक्टरांची ओळख झाला आहे. स्टेथस्कोपच्या माध्यमातून डॉक्टर हृदयाचे ठोके, कफ या स्थिती जाणून घेतात आणि त्यानुसार उपचार करतात. या स्टेथस्कोपची क्रेझ अनेकांमध्ये बघायला मिळते. पण स्टेथस्कोपचा शोध लागला कसा यामागे एक खास कारण आहे. जे अनेकांना माहीत नसेल किंवा कुणी विचारही केला नसेल. चला जाणून घेऊ स्टेथस्कोप निर्मितीची गोष्ट...
डॉ.रेने लिनेक यांनी लावला शोध
लिनेक यांचा जन्म १७८१ मध्ये फ्रान्समध्ये झाला. त्यांनी मेडिसिनचा अभ्यास त्यांच्या फ्रान्समधीन फिजिशिअन काकांच्या मार्गदर्शनात केला. फ्रान्सच्या क्रांतीत त्यांना मेडिकल सैनिक म्हणून पाहिलं जात होतं. लिनेक हे विद्यार्थी असतानापासून प्रसिद्ध होते. कारण ते फार हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांनी १८०१ मध्ये पॅरिसमध्ये पुन्हा शिक्षण सुरू केलं आणि फ्रान्समधील नेके हॉस्पिटलमध्ये कामही सुरू केलं होतं.
कशी झाली स्टेथस्कोप निर्मिती?
(Image Credit : pastmedicalhistory.co.uk)
१८१६ मध्ये लाजाळू स्वभावाच्या लिनेक यांनी स्टेथस्कोपचा आविष्कार केला. यामागे एक मजोदार किस्सा आहे. पूर्वी डॉक्टर रूग्णांच्या छातीला कान लावून तपासत असत. पण महिलांना तपासताना डॉक्टर आणि महिला रूग्ण दोघांनाही अवघड व्हायचं. लिनेक यांच्यासोबतही हेच व्हायचं. ते एका हृदयरोगाने पीडित महिलेलं चेकअप करत होते. यात सामान्यपणे रूग्णाच्या हृदयाचे ठोके तपासले जातात.
डॉक्टरांची पंचाईत
ही जी महिला डॉक्टरांकडे आली ती बरीच लठ्ठ होती. डॉ. लिनेक यांना नेहमीच्या पद्धतीने कान टेकवून हृदयाची धडधड ऐकू येईना. रेनेचे प्रयत्न चालू आणि बाई अस्वस्थ होऊ लागल्या. शेवटी रेनेने आपल्याजवळील एका जाडसर कागदाची नळकांडी केली आणि एक टोक छातीवर टेकवून नळकांडीच्या दुसऱ्या टोकाशी कान लावला. त्यांना छातीतील आवाज स्पष्ट ऐकू आले. नंतर त्याच्या लक्षात आले की, छातीला कान लावण्यापेक्षा नळकांडीतून जास्त छान ऐकू येते. तर हा पहिला स्टेथोस्कोप.