मुलाखत नागरी सेवा (IAS) परीक्षेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2017 12:04 AM2017-04-09T00:04:19+5:302017-04-09T00:04:19+5:30
मुलाखत इंग्रजी, हिंदी अथवा मराठीतून देता येते. उमेदवारांचा प्रामाणिकपणा, वैचारिक पातळी, आत्मविश्वास, प्रगल्भता, क्षमता यांचा कस विविध प्रश्नांच्या माध्यमातून
- प्रा. राजेंद्र चिंचोले
मुलाखत इंग्रजी, हिंदी अथवा मराठीतून देता येते. उमेदवारांचा प्रामाणिकपणा, वैचारिक पातळी, आत्मविश्वास, प्रगल्भता, क्षमता यांचा कस विविध प्रश्नांच्या माध्यमातून मुलाखतीच्या पॅनेलद्वारे लावला जातो. मुख्य परीक्षेच्या अर्जात नमूद केलेली वैयक्तिक माहिती व बायोडाटा मुलाखतीचा गाभा असतो. व्यक्तिमत्त्व चाचणीद्वारे उमेदवाराची प्रशासकीय पदासाठीची योग्यता बाळगणे आवश्यक आहे.
नागरी सेवेची मुलाखत म्हणजेच व्यक्तिमत्त्व चाचणी हा नागरी सेवा परीक्षेचा अंतिम व अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने २७५ गुण निर्धारित केले आहेत. मुख्य परीक्षेच्या ७ पेपर्समधील (भारतीय भाषा व इंग्रजी सोडून) १७५० गुण व मुलाखतीचे २७५ गुण यापैकी प्राप्त केलेल्या गुणांची बेरीज करूनच विद्यार्थ्यांची IAS, IPS, IFS, गट अ, गट ब सेवा यासाठी निवड केली जाते.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने मुलाखतीऐवजी व्यक्तिमत्त्व चाचणी हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक केलेला आहे. यासाठी विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती, विद्यार्थ्यांच्या गाव, परिसर, जिल्हा, विभाग व राज्याची माहिती, शैक्षणिक माहिती, छंद, आवड, सामाजिक सेवेतील रस, नागरी सेवेत येण्याचा उद्देश, क्रीडा क्षेत्र, चालू घडामोडी, वैकल्पिक विषय या घटकांची तयारी करणे आवश्यक महत्त्वाचे ठरते.
उमेदवाराला मुलाखतीत सामाजिक जाणीव, निर्णय क्षमता, जिज्ञासू वृत्ती, कल्पकता, आत्मविश्वास, देहबोली, भाषा कौशल्य, संवाद कौशल्य, वैचारिक प्रगल्भता व स्पष्टता या बाबी तपासल्या जातात. यासाठी विविध मुद्द्यांचे आकलन, स्वमत, वाचन, गटचर्चा, बोलण्याचा भरपूर सराव याद्वारे मुलाखतीची प्रभावीरीत्या तयारी करता येते. मुलाखत इंग्रजी, हिंदी अथवा मराठीतून देता येते. उमेदवारांचा प्रामाणिकपणा, वैचारिक पातळी, आत्मविश्वास, प्रगल्भता, क्षमता यांचा कस विविध मुलाखतीच्या पॅनेलद्वारे लावला जातो.
व्यक्तिमत्त्व चाचणीद्वारे उमेदवाराची प्रशासकीय पदासाठीची योग्यता बाळगणे आवश्यक आहे. नागरी सेवेद्वारे देशाचे प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी संतुलित विचार भावनांवर नियंत्रण, धीर, समाजाविषयी आस्था, स्थितप्रज्ञता, नावीन्यपूर्णता, क्षमता, आत्मविश्वास, सर्व विषयांचे ज्ञान याची जाण असणे आवश्यक आहे. व्यक्तिमत्त्व चाचणीतील यशासाठी सखोल ज्ञान, संदर्भ ग्रंथाचा वापर, इंग्रजीचे ज्ञान या गोष्टी आवश्यक आहेत.
मुलाखतीत पास किंवा नापास असा काहीही प्रकार नसतो. मुलाखत हा लेखी परीक्षेचा एक घटक असतो. मुलाखतीत चांगले गुण मिळाल्यास अंतिम यादीत स्थान मिळण्याची किंवा चांगले पद मिळण्याची शक्यता वाढते.