राज्यातील 'हा' रेल्वे ट्रॅकही आजही ब्रिटिशांच्या ताब्यात; भारताला द्यावा लागतो कर, पण का?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 08:11 PM2022-05-16T20:11:47+5:302022-05-16T20:14:37+5:30
ब्रिटिशांच्या ताब्यात असलेला भारतातील एकमेव रेल्वे ट्रॅक महाराष्ट्रात आहे...
भारतात दररोज हजारो ट्रेन धावतात. या ट्रेनमधून कोट्यवधी लोक प्रवास करतात. त्यामुळेच तर रेल्वेला लाईफलाईन म्हटलं जातं. भारतीय रेल्वेचं जाळं खूप मोठं आहे. पण आजही भारतात एक असा रेल्वे ट्रॅक आहे, ज्यावर ब्रिटनचा ताबा आहे. या ट्रॅकवरून ट्रेन चालवण्यासाठी भारतीय रेल्वेला ब्रिटनमधील एका खासगी कंपनीला वर्षाकाठी १ कोटी २० लाख रुपये द्यावे लागतात.
स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आली तरीही ब्रिटिशांच्या ताब्यात असलेला रेल्वे ट्रॅक अमरावतीत आहे. या ट्रॅकवरून शंकुतला एक्स्प्रेस धावते. त्यामुळे हा रेल्वे ट्रॅक शंकुतला रेल्वे ट्रॅक म्हणून ओळखला जातो. १९०३ मध्ये ब्रिटिश कंपनी क्लिक निक्सननं या ट्रॅकचं काम सुरू केलं. १९१६ मध्ये तो तयार झाला. ही कंपनी आज सेंट्रल प्रोविन्स रेल्वे कंपनी नावानं ओळखली जाते.
अमरावती कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. कापूस मुंबईतील बंदरांपर्यंत पोहोचवण्यासाठी इंग्रज या ट्रॅकचा वापर करायचे. कापसाच्या शेतीमुळे ब्रिटनमधील खासगी कंपनीनं हा ट्रॅक विकसित केला. या ट्रॅकवर आजही त्याच कंपनीचा ताबा आहे. त्याची देखभाल कंपनीकडूनच केली जाते. त्यासाठी भारतीय रेल्वेला सेंट्रल प्रोविन्स रेल्वे कंपनीला दरवर्षी पैसे द्यावे लागतात.
ब्रिटिश कंपनीला देखभाल दुरुस्तीसाठी पैसे दिले जात असूनही रेल्वे ट्रॅकची स्थिती वाईट आहे. त्यामुळे या ट्रॅकवरून धावणाऱ्या ट्रेनचा वेग जास्तीत जास्त २० किमी प्रतितास असतो. या रेल्वे मार्गावरून दररोज हजारो लोक प्रवास करतात.