आमच्या कोंबड्याच्या लग्नाला यायचं हं; अनोख्या आमंत्रणाची गावभर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2018 10:06 AM2018-05-09T10:06:13+5:302018-05-09T10:06:13+5:30
कोंबड्याची लग्नासाठी आमंत्रण पत्रिका, मंडप, मेजवानी आणि बरंच काही
रायपूर: बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरचं लग्न, उद्योगपती मुकेश अंबानींची लेक ईशाचा साखरपुडा यांची सध्या सर्वत्र चर्चा आहे. मात्र छत्तीसगडमधल्या दंतेवाडात चर्चा आहे ती कालियाच्या लग्नाची. विशेष म्हणजे हा कालिया कोणी माणूस नाहीय, तर कोंबडा आहे. कालियाचं सुंदरी नावाच्या कोंबडीशी लग्न झालंय. अगदी थाटामाटात हा विवाह सोहळा संपन्न झालाय.
छत्तीसगडमधील दंतेवाडातल्या हिरानारमध्ये कालिया आणि सुंदरीचा लग्न सोहळा पार पडलाय. कडकनाथ प्रजातीच्या कोंबड्याबद्दल जनजागृती व्हावी, यासाठी या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. काल हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी मंडप घालण्यात होता. याशिवाय आमंत्रण पत्रिकादेखील छापण्यात आल्या होत्या. लग्न सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांसाठी मेजवानीची व्यवस्थाही करण्यात आली होती. या अजब लग्नाच्या गजब सोहळ्याची मोठी चर्चा सर्वत्र सुरू होती.
कडकनाथ प्रजातीच्या कोंबड्यासाठी जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग मिळावा म्हणून मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मोठी चढाओढ सुरू होती. मात्र यामध्ये मध्य प्रदेशला यश मिळालं. याच पार्श्वभूमीवर छत्तीसगडमध्ये कडकनाथ प्रजातीच्या कोंबडीचा विवाह अगदी दणक्यात पार पडला. 'कडकनाथ प्रजातीच्या कोंबड्यांचं प्रमाण कमी झालं होतं. त्यामुळे ही प्रजाती दुर्मिळ होते की काय, अशी भीती आम्हाला वाटत होती. मात्र आता या प्रजातीच्या कोंबड्यांची संख्या वाढलीय. त्यामुळे हा क्षण साजरा करण्यासाठी आम्ही हा विवाह सोहळा आयोजित केला होता,' अशी माहिती कुक्कुटपालन उद्योगाचे दंतेवाडा विभागाचे अध्यक्ष लुद्रु नाग यांनी दिली.