हौस पडली महागात! महिलेने डोळ्यांमध्ये काढला टॅटू; आता झाली भयंकर अवस्था, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 04:16 PM2022-12-09T16:16:51+5:302022-12-09T16:17:53+5:30
फक्त शरीरावरच नाही, तर डोळ्यांच्या बुबुळांमध्येही टॅटू काढला आहे.
सध्या टॅटूची क्रेझ पाहायला मिळत आहे. लोक शरीराच्या विविध भागांवर टॅटू काढून घेतात. काही जण आपल्या संपूर्ण शरीराला जणू नोटीस बोर्ड मानतात आणि अगदी डोक्यापासून पायापर्यंत टॅटू काढून घेतात. काही जण वर्ल्ड रेकॉर्डसाठी, तर काही जण प्रसिद्ध सेलिब्रिटीची कॉपी करून टॅटू काढतात. आयर्लंडमधल्या एका महिलेच्या बाबतीतही हेच घडलं. धक्कादायक बाब म्हणजे फक्त शरीरावरच नाही, तर डोळ्यांच्या बुबुळांमध्येही टॅटू काढला आहे. याचा परिणाम म्हणजे आता हळूहळू तिची दृष्टी नाहीशी होऊ लागली आहे.
ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, 32 वर्षांची अनाया पीटरसन ही लॉची विद्यार्थिनी असून पाच मुलांची आई आहे. ती एंबर ल्यूक नावाच्या सोशल मीडिया इंफ्लुएंसरची खूप मोठी चाहती आहे. एंबर तिच्या शरीरावर काढलेल्या टॅटूसाठी खूप प्रसिद्ध आहे. एंबर ल्यूकने डोळ्यांच्या पांढर्या भागावर म्हणजेच बुबुळांवर टॅटू काढला होता. तिचंच अनुकरण करून अनायानेही डोळ्यात टॅटू काढण्याचा विचार केला. अनायाच्या सात वर्षांच्या मुलीने दृष्टी जाण्याची शक्यता बोलूनही दाखवली होती. पण तिने मुलीचं ऐकलं नाही आणि 2020मध्ये डोळ्यात टॅटू काढला.
जुलै 2020मध्ये अनायाने उजव्या डोळ्यात टॅटू काढला. त्यानंतर अनेक दिवस डोळ्यांची जळजळ होत होती आणि ते कोरडेही पडले होते. तसंच तिला तीव्र डोकेदुखीचा त्रास होत होता. या सगळ्या गोष्टी माहीत असूनही तिने पाच महिन्यानंतर डाव्या डोळ्यातही टॅटू गोंदवून घेतला. ही प्रक्रिया व्यवस्थित पार पडली आणि काही महिने कोणतीही अडचण आली नाही; पण गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एक दिवस झोपेतून उठल्यानंतर तिचे डोळे मोठ्या प्रमाणात सुजले होते.
तिच्या डोळ्यांची सूज वाढत होती, म्हणून ती हॉस्पिटलमध्ये गेली. तिथे तिला तीन दिवस थेंबाद्वारे अँटीबायोटिक्स देण्यात आलं. यानंतर डोळ्यांची बायोप्सीही करण्यात आली. दृष्टी पूर्ववत व्हावी म्हणून डोळ्यांची शस्त्रक्रिया करावी लागली. थोडी विश्रांती मिळाल्यावर तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्जही देण्यात आला; पण ती पूर्णपणे बरी होऊ शकली नाही. डोळ्यांची जळजळ थांबली असली तरी टॅटूच्या रंगामुळे अनायाची दृष्टी हळूहळू कमी होत आहे. तसेच दृष्टी पूर्ण जाण्याचाही धोका आहे. दृष्टी कमी झाल्यामुळे आता अनायाला आपल्या कृत्याचा पश्चाताप होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"