कोरोना लसीचा डोस घ्यायचा नसल्यानं 'तो' बोगस हात लावून गेला अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 02:21 PM2021-12-04T14:21:00+5:302021-12-04T14:21:27+5:30
कोरोना लसीचा डोस टाळण्यासाठी लढवली शक्कल
जगात कोरोनाचा कहर अद्याप कायम आहे. नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटनं सगळ्यांची चिंता वाढली आहे. भारतासह तीन डझन देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत. नव्या व्हेरिएंटचं संकट कायम असताना लसीकरण मोहिम सुरू आहे. भारतातही लसीकरण अभियान वेगात सुरू आहे. मात्र इटलीत लसीकरण मोहिमेदरम्यान भलताच प्रकार घडला आहे.
कोरोना लस घेण्याची इच्छा नसलेल्या एका व्यक्तीनं डोस टाळण्यासाठी भलतीच शक्कल लढवली. डोस टाळण्यासाठी त्यानं लढवलेलं डोकं पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. इटलीच्या वायव्य भागात असलेल्या बिएलामध्ये एक ५० वर्षीय व्यक्ती कोरोना लसीकरण प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लस घ्यायला गेला. मात्र त्याला डोस घ्यायचा नव्हता. त्यामुळे त्यानं वेगळीच शक्कल लढवली.
लस घ्यायची नाही, पण प्रमाणपत्र हवं यासाठी व्यक्तीनं वेगळाच जुगाड केला. लस घेण्यासाठी केंद्रावर पोहोचल्यावर त्याला नर्सनं शर्टच्या बाह्या वर करण्यास सांगितलं. व्यक्तीनं शर्टची वरील बटणं उघडून दंडाचा काही भाग पुढे केला. नर्सनं डोस देण्यासाठी दंडाच्या काही भागाला स्पर्श केला. तिला स्पर्श वेगळा जाणवला आणि त्यामुळे संशय आला.
काहीतरी गडबड असल्याचं नर्सला समजलं. तिनं व्यक्तीला संपूर्ण हात दाखवण्यास सांगितलं. व्यक्तीचा हात पाहून नर्सला धक्काच बसला. व्यक्तीचा हात सिलिकॉनचा होता. आपलं पितळ उघडं पडल्याचं लक्षात येताच त्यानं नर्सला लाच देण्याचा प्रयत्न केला. मात्र तिनं नकार देत तक्रार दाखल केली. लसीची भीती वाटत असल्यानं संबंधितानं हा प्रकार केल्याची माहिती चौकशीतून पुढे आली.