७ आंब्यांसाठी ४ रखवालदार अन् ६ कुत्रे तैनात; असं आहे तरी काय आंब्यांत? किंमत ऐकून चक्रावून जाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 10:14 AM2021-06-18T10:14:23+5:302021-06-18T10:19:17+5:30
जपानी मातीत पिकणारा आंबा भारतीय मातीत पिकवून दाखवला; आंतररराष्ट्रीय बाजारात जबरदस्त भाव मिळणार
जबलपूर: व्हीव्हीआयपींना मिळणारी झेड प्लस सुरक्षा तुम्ही पाहिली असेल. अनेकदा तुम्ही या सुरक्षेबद्दल ऐकलंदेखील असेल. पण आंब्यांना मिळणारी कडेकोट सुरक्षा तुम्ही कधी पाहिलीय? मध्य प्रदेशातल्या जबलपूरमधील ७ आंब्यांना २४ तास सुरक्षा दिली जात आहे. आंबे बागायतदारानं सुरक्षेसाठी ४ रखवालदार आणि ६ कुत्रे तैनात केले आहेत. आंबे चोरीला जाऊ नयेत यासाठी रखवालदार दिवसरात्र डोळ्यात तैल घाऊन पहारा देत आहेत. या अनोख्या व्हीव्हीआयपी संरक्षणाची सध्या पंचक्रोशीत चर्चा आहे.
बाबो! एका आंब्याची किंमत २.७० लाख; कृषी अधिकारी हैराण, पाहणी करणार
जबलपूरमध्ये २४ तास कडेकोट बंदोबस्तात असलेल्या आंब्यांची किंमत शेकडो, हजारो नव्हे, तर लाखोंच्या घरात आहे. या आंब्याचं नाव टायगो नो टमैंगोश असं आहे. हा आंबा प्रामुख्यानं जपानमध्ये आढळून येतो. या एका आंब्याला आंतरराष्ट्रीय बाजारात २ लाख ७० हजार रुपये इतका दर मिळतो अशी माहिती बगिच्याचे मालक संकल्प सिंह परिहार यांनी दिली.
परिहार यांच्या बागेत एकूण १४ प्रजातींचे आंबे आहेत. बगिच्यात टायगो नो टमैंगोश प्रजातीचे केवळ सातच आंबे आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी ४ रखवालदार आणि ६ कुत्रे तैनात केले गेले आहेत. या आंब्यांना एग ऑफ सन असंही म्हटलं जातं. कारण हा आंबा पिकल्यावर लाल आणि पिवळ्या रंगाचा दिसतो. एका आंब्याचं वजन जवळपास ९०० ग्रॅम असतं. चवीला तो अतिशय गोड असतो.
ही आहे फळांची 'महाराणी'! एका आंब्याची किंमत 1000 रुपये, नाव आहे 'नूरजहां'
जपानमध्ये टायगो नो टमैंगोश आंब्याचं उत्पादन संरक्षक वातावरणात घेतलं जातं. मात्र परिहार यांनी त्यांच्या ओसाड जमिनीवर खुल्या वातावरणात या आंब्याचं उत्पादन घेतलं. लाखो रुपये किंमत असलेल्या आंब्याची बातमी जबलपूरमध्ये चौफेर पसरली. त्यामुळे परिहार यांना नुकसान सहन करावं लागलं. बगिच्यामध्ये चोरीच्या घटना घडल्या. त्यामुळे आता परिहार यांनी आंब्याच्या संरक्षणासाठी कुत्रे आणि रखवालदार ठेवले आहेत. चोरीच्या घटना रोखण्यासाठी त्यांच्याकडून दिवसरात्र पहारा दिला जात आहे.