LockDown: मुंबईतील जैन दाम्पत्याचा नागरिकांना धडा, लॉकडाऊनमध्ये केले डिजिटल बेबीशॉवर!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 07:54 PM2020-04-10T19:54:15+5:302020-04-11T11:17:03+5:30
लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना मुंबईतील एका दाम्पत्याने अनोख्या पद्धतीने संदेश दिला आहे.
कोरोनाला हरवण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घरातच थांबण्याचं आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सगळे दैनंदिन व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे अनेक जण घरातच कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहेत. लॉकडाऊनचा फटका विशेष कार्यक्रम आणि सोहळ्यांनाही बसला आहे. लॉकडाऊन असल्याने गर्दी टाळण्यासाठी अनेकांचे ठरलेले लग्नसोहळे पुढे ढकलण्यात आले आहेत. नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचं आवाहन करुनही अनेकजण कोणतं ना कोणतं कारण घेऊन रस्त्यावर फिरत आहेत.
लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना मुंबईतील एका दाम्पत्याने अनोख्या पद्धतीने संदेश दिला आहे. मुंबईच्या मालाड परिसरात विशाल जैन आपल्या पत्नीसह राहतात. या दाम्पत्याच्या आयुष्यात लवकरच एका नवीन पाहुण्याची एंट्री होणार आहे. याच निमित्ताने विशाल जैन यांनी बेबी शॉवर कार्यक्रम करण्याचे ठरवले होते. हा सोहळा कुटुंबीयांसोबत खास पद्धतीने साजरा करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. मात्र सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊनमुळे ते शक्य नव्हतं. त्यावर त्यांनी एक अनोखी शक्कल लढवली. आजच्या इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या दुनियेत काहीही अशक्य नाही. हीच बाब लक्षात घेऊन जैन कुटुंबीयांनी बेबीशॉवरचा सोहळा डिजिटल पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी संध्याकाळी विशाल जैन आणि पत्नी त्यांच्या घरी तर त्यांचे नातेवाईकांनी स्वतःच्या घरातून डिजिटल माध्यमातून एकमेकांशी कनेक्ट झाले. यानंतर त्यांनी एकमेकांशी संवाद तर साधलाच शिवाय बेबीशॉवरचा सोहळाही पार पाडला.
यावेळी नातेवाईकांनी विशाल जैन आणि त्यांच्या पत्नीला डिजिटल स्वरुपात शुभेच्छा देत अभिनंदन केलं. शिवाय डिजिटलच्या माध्यमातून भेटवस्तूही दिल्या. एकूणच काय तर डिजिटल माध्यमातून जैन कुटुंबीयांनी घराबाहेर पडणं तर टाळलं आणि आयुष्यातील मोठा सोहळाही साजरा केला. जैन दाम्पत्य आणि त्यांच्या नातेवाईकांनी या डिजिटल सोहळ्यातून राज्यातील जनतेला घरी राहूनही सेलिब्रेशन करता येतं हे दाखवून दिलं आहे. त्यामुळे नियम पाळा, गर्दी टाळा, कोरोनाला घाला आळा...