लग्नाच्या सात दिवसांनंतर पत्नीला सिनेमाला घेऊन गेला, इंटरव्हलमध्ये फरार झाली पत्नी...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 11:41 AM2023-07-07T11:41:46+5:302023-07-07T11:42:55+5:30
Bride Run Away from Cinema Hall : लग्नाच्या सात दिवसांनंतर पती पत्नीला सिनेमा दाखवायला घेऊन गेला. पण इंटरव्हलमध्ये पत्नी पळून गेली आणि पती तिला शोधत राहिला.
Bride Run Away from Cinema Hall : कुणाच्याही आयुष्यात लग्न ही फार महत्वाची आणि मोठी बाब असते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा असतो तो हनीमून. ही नव्या आयुष्याची सुरूवात असते. पण विचार करा की, जर हनीमून दरम्यान थिएटरमध्ये सिनेमा बघताना जर एखाद्या व्यक्तीची पत्नी मधेच पळून गेली तर....? अशीच एक घटना जयपूरमध्ये घडली. इथे लग्नाच्या सात दिवसांनंतर पती पत्नीला सिनेमा दाखवायला घेऊन गेला. पण इंटरव्हलमध्ये पत्नी पळून गेली आणि पती तिला शोधत राहिला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीकर इथे राहणाऱ्या तरूणाचं लग्न सात दिवसांआधी तिथेच राहणाऱ्या तरूणीसोबत झालं होतं. दोघेही हनीमूनसाठी जयपूरला गेले होते. यावेळी पिंक स्क्वायर मॉलमध्ये ते सिनेमा बघायला गेले. दोघेही दुपारी 12 ते 3 शो बघत होते.
झालं असं की, जसा सिनेमाचा पहिला भाग झाला पती बाहेर काही खाण्यासाठी आणण्यासाठी गेला होता. याच वेळात पत्नी गपचूप तिथून गायब झाली. म्हणजे पत्नी इंटरव्हलमध्ये सिनेमा हॉलमधून फरार झाली. जेव्हा पती परत आला तेव्हा त्याला पत्नी सीटवर दिसली नाही. मग त्याने पूर्ण थिएटरमध्ये तिचा शोध घेतला. पण तिचा पत्ता कुठेच लागला नाही. फोन केला तर तिचा फोन स्वीच ऑफ होता. शेवटी तो पोलिसांकडे गेला आणि त्याने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
एका दुसऱ्या मीडिया रिपोर्टनुसार, यादरम्यान थिएटरमधून फरार झालेली विवाहित महिला जयपूरच्या शाहपूरा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. तिने पोलिसांना सांगितलं की, ती या लग्नाने आनंदी नाहीये आणि त्यामुळेच ती थिएटरमधून फरार झाली. आता दोन्ही परिवाराती लोक नवरीला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत.