भारतातील 'या' वास्तूचे ५ पैकी चार मजले आहेत पाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 04:01 PM2020-04-17T16:01:07+5:302020-04-17T17:38:29+5:30
महालात कधीही गरमीचं वातावरण नसतं. या महालाचा सुंदर नजारा पाहण्यासारखा असतो.
जगभरातील प्रसिध्द अशा अनेक ऐतिहासिक वास्तू भारतात आहेत. राजस्थानमध्ये अनेक प्राचीन वास्तूचं दर्शन तुम्हाला होईल. जगभरात प्रसिध्द असलेल्या ठिकाणांपैकी भारतात असलेल्या एका अनोख्या वास्तूंबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही इमारत पाण्यातील इमारत म्हणून ओळखली जाते. ही इमारत आतासुद्धा दोनशे वर्षांपूर्वी जशी होती तशीच उभी आहे.
भारतातील या ऐतिहासिक वास्तूला जल महाल असं म्हटलं जातं. राजस्थानातील जयपूरमध्ये ही वास्तू आहे. खरं तर ही वास्तू एखाद्या महालाप्रमाणे आहे. जयपुर-आमेर रस्त्यावर मानसागर तलावामध्ये याची स्थापना झाली आहे. हा महाल सवाई जयसिंहाने १७९९ मध्ये तयार केला होता.
अरवली पर्वतात असलेल्या या महालाला मानसागर तलावाच्या मधोमध असल्यामुळे 'आई बॉल' असं सुद्धा म्हणलं जातं. तसंच 'रोमँटिक महल' असं नाव या महालाला देण्यात आलं आहे. कारण तत्कालीन राजा आपल्या राणीसोबत चांगला वेळ घालवण्यसाठी या महालाचा वापर करत होता. याशिवाय मोठ्या सण- उत्सवांच्यावेळी या महालाचा वापर केला जात होता.
पाच मजल्यांच्या असलेल्या या महालाची खासियत अशी आहे की, पाच मजल्यांपैकी फक्त एक मजला वर आणि बाकिचे तीन चार मजले पाण्याखाली आहेत. म्हणून या महालात कधीही गरमीचं वातावरण नसतं. या महालाचा सुंदर नजारा पाहण्यासारखा असतो. रात्रीच्यावेळी या महालाला पाहण्याचा आनंद काही वेळगाच आहे.
तुमचा वाचून विश्वास बसणार नाही पण या जल महालातील परिसरात एक लाखापेक्षा जास्त झाडं लावली आहेत. दिवसरात्र या झाडांची काळजी घेतली जाते. जवळपास ४० माणसांचा समावेश झाडांचा सांभाळ करण्यासाठी केला आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक फिरण्यासाठी येतात.