कौतुकास्पद! शेतीमुळे तरुणाचं नशीब फळफळलं; कष्टाच्या जोरावर लाखोंचं उत्पन्न मिळवून दिलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 04:34 PM2022-10-03T16:34:01+5:302022-10-03T16:40:40+5:30
आपल्या जमिनीवर ऑर्गेनिक आणि इनोव्हेटिव्ह पद्धतीने शेती करायला सुरुवात केली आणि हा शेतीने काही दिवसांतच मोहम्मद अयूबचं नशीब फळफळलं.
प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. जम्मू काश्मीरच्या शोपियां येथील सफा नगरी या छोट्याशा गावात राहणाऱ्या तरुणाने कमाल केली आहे. मोहम्मद अयूब असं या तरुणाचं नाव असून त्याने मेहनतीच्या जोरावर सरकारी नोकरीशिवाय देखील चांगले पैसे कमवू शकतो हे सिद्ध केलं आहे. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्याने नोकरी शोधली पण सरकारी किंवा खासगी ठिकाणी त्याला नोकरी मिळाली नाही. पण तो निराश झाला नाही.
मोहम्मदने काही तरी वेगळं करण्याचा विचार केला. आपल्या जमिनीवर ऑर्गेनिक आणि इनोव्हेटिव्ह पद्धतीने शेती करायला सुरुवात केली आणि हा शेतीने काही दिवसांतच मोहम्मद अयूबचं नशीब फळफळलं. त्यांच्याकडे दोन एकर जमीन आहे. तो त्यावर सध्या भाज्या पिकवतो. साधारण वर्षाला तो सहा लाख रुपये हे शेतीतून कमावतो. मोहम्मदने दिलेल्या माहितीनुसार, ज्या भाज्यांची बाजारात मागणी आहे. त्याचीच तो शेती करतो.
काश्मीरमध्ये सफरचंदाचं उत्पादन हे जास्त होतं. पण उत्पादन जास्त असल्याने त्याच्या किमतीत घसरण होते. या वेळी बाजारात सफरचंद हे 20 ते 25 रुपये किलोने विकलं जात आहे. त्यामुळेच त्याने मुळ्याची शेती करण्याचा विचार केला. यातून तो प्रतिकिलो 50 रुपये कमवत आहे. बेरोजगार तरुण अशापद्धतीने शेती करून चांगलं उत्पन्न मिळवू शकतात असं मोहम्मद अयूब याने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"